ICICI Bank -Videocon Loan Fraud Case: चंदा कोचर आणि पती दीपक यांच्या सुटकेचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
कोचर दाम्पत्याला झालेली अटक ही अटक सीआरपीसीच्या 41A च्या आदेशानुसार नाही, असे सांगत त्यांना तरुंगातून मुक्त करावे असे न्यायालयाने आदेश सुनावताना सांगितले.
आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याचे समजते. वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांच्या व्हिडिओकॉन समूहाला (Videocon Group) अवैधरित्या कर्ज दिल्याचा ठपका ठेवत आणि या प्रकरणात मनी लॉन्डींग झाल्याच्या आरोपाखाली कोचर दाम्पत्यास सीबीआयने अटक केली होती. यावर आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत कोचर दाम्पत्याने न्ययालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी (6 जानेवारी) झालेल्या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. जो कोर्टाने सोमवारी (9 जानेवारी) हा जाहीर केला.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर कोचर यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. कोचर दाम्पत्याला झालेली अटक ही अटक सीआरपीसीच्या 41A च्या आदेशानुसार नाही, असे सांगत त्यांना तरुंगातून मुक्त करावे असे न्यायालयाने आदेश सुनावताना सांगितले. (हेही वाचा, ICICI Bank -Videocon Loan Fraud Case: चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी)
चंदा कोचर आणि दीपक कोचर यांनी झालेल्या अटकेविरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. 2009-2012 दरम्यान आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्जांमधील अनियमिता प्रकरणात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची आणि रिमांड ऑर्डरची मागणी रद्द करत अंतरिम सुटकेची मागणी केली. या याचिकेद्वारे करण्यात आली होती.