Ajit Pawar यांचे पुत्र Parth Pawar यांच्याही कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार शुगर या कारखान्यावर कारवाई सुरू आहे.

Ajit Pawar, Parth Pawar | (Photo Credits: Facebook)

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यावर ईडीने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार शुगर या कारखान्यावर कारवाई सुरू आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. यातच पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या मुंबईच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

शिवालिक ग्रुप, चोराडिया, अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी, डीबी रियालिटी, विवेक जाधव यांचे घर, अशा काही ठिकाणी आयकर विभागाची छापा टाकला आहे. दरम्यान, पार्थ पवार यांचं मुंबईतील नरिमन पॉईंट या ठिकाणी कार्यालय आहे. तिथे आयकर विभागाने छापा घालत काही संशयास्पद कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Mission Kavach Kundal Yojana: महाराष्ट्रात 'मिशन कवच कुंडल योजने'ला आजपासून सुरुवात, दिवसाला 15 लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य

छापेमारी कोणावर करावी, हा प्राप्तिकर विभागाचा अधिकार आहे. जर त्यांना काही संशय आहे. तर, ते छापेमारी करू शकतात. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कोणताही कर कसा चुकवायचा नाही हे मला चांगल माहिती आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच बहिणींच्या कंपनीच्या चौकशी करण्यात आल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांच्या कार्यालयावर सुरु असलेल्या आयकर विभागाच्या कारवाईवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे.