'माझा कोकण संपन्न करण्यासाठी जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने देतो'- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल भाविकांना धन्यवाद देतो.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI/Twitter)

शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना ,मालोंड- मालडी कोल्हापुरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी, मालाचा दर्जा चांगला राहावा, त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी शासनाने विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे. कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच. माझा कोकण संपन्न झाला पाहिजे, त्यासाठी जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासियांना माता भगिनींना देतो.

भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल भाविकांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशीर्वाद मागताना कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्ष मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत, याचा निश्चित आनंद आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा वर्धापन दिन सोहळा रद्द; मनसे सदस्य मोहिमेला सुरुवात)

ते पुढे म्हणाले, ‘अनेकजण स्वतःसाठी काही ना काही मागत असतात, पण कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्वस्त म्हणून काम करत आहेत. स्वतःसाठी काही न मागता जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद आहे.’