Aaditya Thackeray On Rebel MLA: बंडखोर आमदार आमच्या डोळ्यात-डोळे घालून पाहू शकत नाहीत, ते त्यांच्या मतदारसंघातील जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार; आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा

त्यावेळी ते मतदारसंघातील लोकांना काय तोंड दाखवणार आहेत? ते तेथील लोकांचा कसा सामना करणार आहेत? असे प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले.

Aaditya Thackeray (PC - ANI)

Aaditya Thackeray On Rebel MLA: महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय संघर्ष थांबल्याचे दिसत आहे. मात्र शिवसेनेच्या दोन गटांमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे शिंदे गटाच्या आमदारांवर वारंवार हल्ले करत आहेत. बंडखोर आमदारांना आमच्याकडे डोळ्यात-डोळे घालून बघता येत नाही, ते त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील जनतेला काय तोंड दाखवणार, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांनी आमदारांना दिल्या जाणाऱ्या अवाजवी सुरक्षेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आज विधानसभेच्या इमारतीत पोहोचलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना आमच्या डोळ्यात-डोळे घालून पाहतादेखील येत नव्हतं. बंडखोर आमदार किती दिवस एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये धावत राहणार आहेत? अखेर या आमदारांना कधीतरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जावे लागेल. त्यावेळी ते मतदारसंघातील लोकांना काय तोंड दाखवणार आहेत? ते तेथील लोकांचा कसा सामना करणार आहेत? असे प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. (हेही वाचा - MNS Maha Sampark Abhiyan: शिवसेनेतील बंडखोरीचा राज ठाकरे घेणार फायदा; कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी 'महासंपर्क अभियान'ची घोषणा)

कसाबलाही एवढी सुरक्षा मिळाली नव्हती -

शिंदे गटाच्या आमदारांना जेवढी सुरक्षा देण्यात आली, तेवढी सुरक्षा दहशतवादी कसाबलाही देण्यात आली नव्हती, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्यांना नेमकी कशाची भीती वाटत आहे? तुमचे काही आमदार पळून जातील, असं तुम्हाला वाटत का? एवढी भीती कशाला?

विशेष म्हणजे बंडखोर आमदार शनिवारी संध्याकाळीच गोव्याहून मुंबईत परतले. राज्यात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. सोमवारी येथे फ्लोर टेस्ट होणार आहे.