मुंबई मधील हॉटेल, बार, रेस्टोरेंट्स आणि फुड कोर्ट रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
मुंबईतील हॉटेल, बार आणि रेस्टोरॅन्ट्स रात्री 1 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. तर दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
मुंबई (Mumbai) शहरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील हॉटेल (Hotel), बार (Bar) आणि रेस्टोरेंट्स (Restaurant) रात्री 1 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास पालिकेने (BMC) परवानगी दिली आहे. तर दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. मद्यविक्रीची दुकाने सकाळी 10 ते रात्री 10.30 या वेळेत खुली राहतील. शहरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने आणि लसीकरण पूर्ण क्षमतेने सुरु असल्याने मुंबई पालिकेने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे. कोविड-19 लॉकडाऊन काळात ठप्प झालेल्या व्यवसायांना नव्याने उभारी घेता येणार आहे.
मात्र कोविड-19 चा धोका अद्याप टळला नसल्याने मास्क वापरणे आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. कोरोना लॉकडाऊननंतर मिशन बिगेन अगेन अंतर्गत मुंबई शहारातील सेवा-सुविधा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या. लॉकडाऊनचा कालावधी 28 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आला असला तरी सुरु करण्यात आलेल्या सेवा तशाच सुरु राहणार आहेत. यापूर्वी थिएटर्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी मुंबईत पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु होणार असल्याचे संकेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने पाऊलं पडत असल्याचे दिसून येत आहे. (Nightlife In Mumbai: मुंबईत नाईटलाईफ तर सुरु होणारच, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया)
दरम्यान, राज्यातील 19,53,926 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या एकूण 34,934 सक्रीय रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.72% इतका झाला आहे.