लॉक डाऊनच्या काळात 5 रुपयांत घरपोच जेवण व 25 टक्के सवलतीच्या दरात मिळणार औषधे; चंद्रकांत पाटील यांची घोषणा
यासाठी उपाययोजन म्हणून भारतात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे.
सध्या संपूर्ण जगावर चालून आलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना, प्रत्येक देश आपल्यापरीने करत आहेत. यासाठी उपाययोजन म्हणून भारतात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे. अशात फक्त अत्यावश्यक सेवाच उपलब्ध असणार आहेत. मात्र यामुळे अनेक गोरगरीब किंवा ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांचे हाल होत आहेत. अशा लोकांच्या मदतीसाठी आता स्थानिक नेते, कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. आता कोथरूड (Kothrud) मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी, आपल्या मतदार संघातील गरजू लोकांसाठी पोळीभाजी आणि औषधांची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघात एक उपक्रम राबवत आहेत, त्याद्वारे त्यांनी पाच रुपयात घरपोच पोळी भाजी देण्याची घोषणा केली आहे. या शिवाय, आमदार चंद्रकांत पाटील यांनी 25 टक्के सवलतीच्या दरात डॉक्टरांनी नियमितपणे घ्यायला सांगितलेली औषधीही गरजूंना पोहोचवली जातील, अशी घोषणा केली आहे.
असा घेऊ शकाल या सेवेचा लाभ –
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘आ चंद्रकांतदादा मदत गट 1’ या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप सुरु करण्यात आला आहे. या ग्रुपचा नंबर 8262879683 असा आहे. पोळीभाजीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत या ग्रुपवर मागणी केली जाऊ शकते. यासाठी आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर व्हाट्सअप मेसेज करुन मागणी नोंदवावी लागणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच केली जाईल. तसेच रात्रीच्या जेवणासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यावर, रात्री 9 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच मिळणार आहे. (हेही वाचा: Coronavirus: पुणे येथील सफाई कर्मचाऱ्यांना खाणे आणि सॅनिटायझरचे वाटप)
औषधांसाठी ‘आ चंद्रकांतदादा मदत गट 2” नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून, त्याचा क्रमांक 9922037062 हा आहे. ज्यांना औषधांची गरज आहे आणि डॉक्टरांनी नियमित घ्यायला सांगितली आहेत, अशा नागरिकांना 25% सवलतीच्या दरात घरपोच प्रिस्क्रिप्शननुसार औषध पोहोचवणार आहेत. यासाठी रोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत औषधांची माहिती देणे गरजेचे आहे.
ज्यांच्या अडचण आहे किंवा जे खरच गरजू आहेत, अशा लोकांनीच या सेवेचा लाभ घ्यावा असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.