नाशिक: मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटायझर करताना आगीचा भडका उडाल्याने एका महिलेचा मृत्यू

नाशिक (Nashik) शहरातील वडाळा (Wadala) गावात ही दुर्दैवी घटना 20 जुलैला रात्री 11 च्या सुमारास घडली.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटायझर करताना आगीचा भडका उडाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक (Nashik) शहरातील वडाळा (Wadala) गावात ही दुर्दैवी घटना 20 जुलैला रात्री 11 च्या सुमारास घडली. या अपघातात संबंधित महिला 90 टक्के भाजली असून उपाचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे कळत आहे. नाशिकमधील इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर वापर जास्त प्रमाणात होत आहे. पण, निकृष्ट दर्जाचे सॅनिटायझर वापरल्यामुळे विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

रजबीया शेख असे त्या मृत महिलेचे नाव आहे. रजबीया शेख नाशिक जिल्ह्यातील वडाळागावातील महेबूबनगर परिसरातील रहिवाशी आहेत. रजबीया शेख यांनी आपल्या घरात लाईट नसल्यामुळे 20 जुलै रोजी मेणबत्ती लावली होती. दरम्यान, त्यांनी रात्री 11 च्या सुमारास घरात सॅनिटायझरची फवारणी केली. त्यामुळे मेणबत्तीच्या ज्वालांशी संपर्क झाल्यामुळे घरात आगीचा भडका उडाला. रजबीया शेख यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिने जोरजोरात ओरडत घराबाहेर धाव घेतली. त्यांचा पती शाहीद आणि आजुबाजुच्या महिलांनी धाव घेऊन आग विझवली. पण तोपर्यंत रजबीया गंभीर भाजल्या. मात्र 24 जुलै रोजी मध्यरात्री नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती टीव्ही9ने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा-कल्याण येथे अंधश्रद्धेमुळे परिवारातील दोन जणांचा बळी, तांत्रिकासह आरोपींना पोलिसांकडून अटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण सॅनिटाइझरचा वापर करत आहे. यामुळे सॅनिटाइझरचा वापर करताना बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलयुक्त पदार्थ असल्यामुळे तो लवकर पेट घेतो. यामुळे सॅनिटाइझर वापरताना केलेली हलगर्जी तुमच्या जीवावर बेतू शकते. तसेच ज्या लोकांच्या घरात लहान मुले आहेत, त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.