गृहमंत्री Anil Deshmukh यांनी Sachin Vaze ला दिले होते महिन्याला 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट; माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा आरोप, जाणून घ्या अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

यामध्ये वसुलीबद्दल सांगितले आहे की, क्राइम इंटेलिजंस यूनिटचे प्रमुख असलेले सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या घरी अनेकवेळा बोलावले होते, जेथे गृहमंत्र्यांनी त्यांना निधी संकलनाचे निर्देश दिले होते.

Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे आता त्यामध्ये मोठा भूकंप झाला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी आयुक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी दावा केला आहे की, महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे कसे वसूल करावेत तेही सांगितले होते. गृहमंत्री म्हणले होते की, मुंबईत 1750 हून अधिक बार, रेस्टॉरंट्स आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये घेतले तरी महिन्यात 40-50 कोटी जमा होतील. याखेरीज उर्वरित रक्कम इतर ठिकाणाहून वसूल करण्यास सांगितले होते.

माजी पोलिस आयुक्तांच्या या प्रदीर्घ पत्रामध्ये गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक गोष्टींचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये वसुलीबद्दल सांगितले आहे की, क्राइम इंटेलिजंस यूनिटचे प्रमुख असलेले सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या घरी अनेकवेळा बोलावले होते, जेथे गृहमंत्र्यांनी त्यांना निधी संकलनाचे निर्देश दिले होते. यावेळी, त्यांचे पीए आणि इतर दोन कर्मचारी सदस्य त्यांच्याबरोबर होते. सिंह पुढे म्हणाले की, या संभाषणानंतर सचिन वाझे मला माझ्या ऑफिसमध्ये भेटायला आले होते. त्यांनी मला संपूर्ण गोष्ट सांगितली. हे सर्व ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो. (हेही वाचा: भाजप नेत्या Medha Kulkarni यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार; महिलेला मारहाण केल्याचा आरोप)

खुद्द गृहमंत्र्यांनीच प्रत्येक महिन्यापोटी 100 कोटी रूपये गोळा करण्याचे आदेश दिले होते या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना, परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.’