Mumbai Police Receives Hoax Call: मुंबई पोलिसांना फसवा कॉल; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शहरात हल्ला करणार असल्याचा केला दावा, चौकशी सुरू
ही बातमी समजताच संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि इतर सर्व यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
Mumbai Police Receives Hoax Call: एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला फोन केला आणि सांगितले की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) शी संबंधित एक व्यक्ती मोठी घटना घडवण्यासाठी मुंबईत येत आहे. कॉलरने बिश्नोईचा सहकारी दादर रेल्वे स्थानकावर येणार असल्याचेही नमूद केले. ही बातमी समजताच संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि इतर सर्व यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी रात्री संपूर्ण दादर स्थानकाची कसून तपासणी केली, परंतु एकही संशयित व्यक्ती सापडला नाही.
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नियंत्रण कक्षाला आलेल्या कॉलची पडताळणी करण्यात आली आणि तो फसवा असल्याचे आढळून आले. पोलीस सध्या फोन नंबरचा वापर करून कॉलरचा माग काढण्यात गुंतले आहेत. (हेही वाचा -Mumbai: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 5 महिन्यांत 79 बॉम्बचे फसवे कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक)
अलीकडेच बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने दोन जणांना अटक केली. ज्यांना बिश्नोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर शूटिंग करण्याची सूचना दिली होती. गोळीबार करण्यासाठी बिष्णोई टोळीने संशयितांना पैसेही दिले होते. (Mumbai Police Received Threatening Call: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांना धमकीचा फोन; शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा केला दावा)
बिहारमधील विकी गुप्ता (वय, 24) आणि सागर पाल (वय,21) अशी या आरोपींची नावे असून त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर चार राऊंड गोळीबार केला. रविवारी पहाटे 5 च्या सुमारास ते पळून गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही आरोपी कैद झाले.
नोव्हेंबर 2022 पासून, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या धमक्यांमुळे सलमानची सुरक्षा पातळी Y-Plus वर वाढवण्यात आली आहे.