Hiware Bazar Gram Panchayat: पोपटराव पवार यांचे ग्रामविकास पॅनल विजयी; 30 वर्षांनीही इतिहास बदलला नाही
एकूण 7 पैकी सर्वच्या सर्व म्हणजे 7 जागांवर पोपटराव पवारांच्या पॅनलचा विजय झाला आहे. हिवरे बाजार गावात तब्बल 30 वर्षांनी पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या आधी अनेक वर्षे या ठिकाणी बिनविरोध निवडणूक पार पडत असे.
हिवरेबाजार ग्रामपंचायत (Hiware Bazar Gram Panchayat) निवडणुकीत पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांच्यासह त्यांचे ग्रामविकास पॅनल (Gramvikas Panel) विजयी झाले आहे. सर्वच्या सर्व जागांवर पवार यांच्या ग्रामविकास पॅनलचे उमेदवार निवडूण आले आहेत. राळेगणसिद्धी, पाटोदा आणि हिवरे बाजार या तिन ग्रामपंचायतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या ठिकाणी सुमारे 20 ते 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायती पार पडल्या होत्या. त्यामुळे या वेळी या ग्रामपंचायत निवडणुकीत जनता कौल कोणाच्या बाजूने देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, पोपटराव पवार यांनी पुन्हा एकदा जनतेच्या मनात आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे.
हिवरे बाजार ग्रामपंचायतीमध्ये एकूण 7 जागांसाठी निवडणूक पार पडली. एकूण 7 पैकी सर्वच्या सर्व म्हणजे 7 जागांवर पोपटराव पवारांच्या पॅनलचा विजय झाला आहे. हिवरे बाजार गावात तब्बल 30 वर्षांनी पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या आधी अनेक वर्षे या ठिकाणी बिनविरोध निवडणूक पार पडत असे. (हेही वाचा, Patoda Gram Panchayat: भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव; पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल)
प्राप्त माहितीनुसार, पोपटराव पवार यांना त्यांच्या वॉर्डातून 282 मते मिळालीआहेत. या ऊलट त्यांच्या विरोधात असलेल्या प्रतिस्पर्ध्याला अवघ्या 44 मतांवर समाधान मानावे लागले आहे. वॉर्ड क्रमांक एकमध्ये ग्रामविकास पॅनलचे विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर हे उमेदवार विजयी झाले. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये याच पॅनलचे रोहिदास पादिर आणि आदीनाथ पवार हे उमेदवार विजयी झाले.
दरम्यान, नेहमीप्रमाणे याही वेळी निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी हिवरे बाजार गावात प्रयत्न झाले. परंतू, गावातील काही लोक आणि पवार यांचे पारंपरीक विरोधकांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. त्यामुळे गावात निवडणूक लागली. परंतू, 30 वर्षानंतरही पुन्हा एकदा पोपटराव पवार यांच्यावरच गावकऱ्यांनी विश्वास दाखवला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान?
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.