Hinganghat Woman Burning Case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे दोषी; उद्या शिक्षेच्या सुनावणीची शक्यता
3 फेब्रुवारी 2020 दिवशी सकाळी बसने अंकिता हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळेने पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले.
महाराष्ट्राला हादरवणारं हिंगणघाट जळीतकांड प्रकरणामध्ये आरोपी विकेश नगराळे (Vikesh Nagrale) याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. उद्या (10 फेब्रुवारी) दिवशी या प्रकरणी विकेशला शिक्षा जाहीर होण्याची शक्यता आहे. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विकेशने प्राध्यापक अंकिता पिसुड्डेला (Ankita Pisudde) एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. उद्या या घटनेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि दुसर्या स्मृतिदिनीच या प्रकरणी आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता आहे.
अंकिता पिसुड्डे या हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. अंकिता आणि विकेश हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावात राहत होते. 3 फेब्रुवारी 2020 दिवशी सकाळी बसने अंकिता हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळेने पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले. आठवडाभर मृत्यूशी झुंजत असलेल्या अंकिताचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नक्की वाचा: हिंगणघाट प्रकरण: आरोपीला लवकरात-लवकर फासावर लटकवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .
जलदगती न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती याप्रकरणी करण्यात आली. विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र 26 दिवसांत सादर करण्यात आले.