Mumbai High Tide Today: मुंबई मध्ये समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा; पावसाची संततधार सुरुच (Watch Video)

त्यामुळे मुंबईतील समुद्राला उधाण आले असून मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा पाहायला मिळत आहेत.

High Tide in Mumbai | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

आज मुंबईत (Mumbai) दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी 4.33 मीटरच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार मुंबईतील समुद्राला उधाण आले असून मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर (Marine Drive) उंचच उंच लाटा पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पावसाची संसतधारही कायम आहे. सुमद्राला आलेल्या उधाणाचा व्हिडिओ एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून मुंबई सह राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. तसंच आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. अनेक ठिकाणी भिंत कोसळणे, झाडं उन्मळून पडणे यांसारख्या घटना घडल्या आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेकांच्या घरात पाणी शिरले. पत्रे उडाले. अशा घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ANI Tweet:

आजही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी विनाकारक घराबाहेर पडू नये, प्रवास करु नये असे आवाहन प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबई सह ठाणे, नवी मुंबई देखील पावसाचा जोर कायम आहे. काल देखील पावसामुळे नेरुळ डीवाय पाटील स्टेडिअमचे मोठे नुकसान झाले. तर अनेक सखल भाग, रस्ते, रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्याचबरोबर जे.जे.हॉस्पिटल, नायर हॉस्पिटलचा परिसरही जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.