High Tide Alert: यंदाच्या पावसाळ्यात 52 दिवस असतील भरतीचे; 4 मीटरपेक्षा उंच उसळणार लाटा, Maharashtra Maritime Board ने प्रसिद्ध केले वेळापत्रक
यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे 52 दिवस चार मीटरपेक्षा जास्त भरतीची स्थिती असणार आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार भारतात मान्सून 4 जून रोजी दाखल होईल. यामुळे मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान येण्याची शक्यता आहे. अशात प्रशासनाकडून भरतीचे दिवस (High Tide Days) जाहीर करण्यात आले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात, सुमारे 52 दिवस हे भरतीचे असणार आहेत. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची वर्तवली गेली आहे. त्या दृष्टीने महापालिका यंत्रणा सतर्क राहणार आहे. नागरिकांनीही या हायटाईड्सची नोंद घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून पावसाळ्यात चार मीटरपेक्षा जास्त उंच भरतीचे दिवस जाहीर केले जातात. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे 52 दिवस चार मीटरपेक्षा जास्त भरतीची स्थिती असणार आहे. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन विभाग) जी.जी.गोदेपुरे यांनी याबाबत माहिती दिली. (हेही वाचा: मुंबईत समुद्रावर बांधला जातोय देशातील सर्वात मोठा पूल; काय आहे 'मुंबई ट्रांस हार्बर लिंक ब्रिज'ची खासियत)
अहवालानुसार, जून महिन्यात 13 दिवस, जुलै महिन्यात 14 दिवस, ऑगस्ट महिन्यात 14 दिवस आणि सप्टेंबर महिन्यात 11 दिवस भरती असेल. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने हे हाय टाईड वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:00 वाजता सर्वोच्च लाट धडकेल आणि या लाटांची उंची साधारण 4.60 मीटर असेल. या पावसाळ्यात भरती-ओहोटीच्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने केले आहे.