दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी; आझाद मैदान सोडून इतर कुठेही आंदोलन करण्यास परवानगी नाही
आता निषेधाच्या भीतीमुळे मुंबईमधील दक्षता वाढवण्यात आली आहे
सीएए (CAA) आणि एनआरसीला (NRC) विरोध आणि पाठिंबा अशा दोन्ही गोष्टींबाबत सोमवारी हिंसाचार भडकला. राजधानी दिल्लीत (Delhi) सीएए आणि एनआरसीविरोधात निदर्शने अजून सुरू आहेत. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर डीसीपीसह अनेक पोलिस जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईमध्येही (Mumbai) काल रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे अशा प्रकारचा निषेध नोंदवण्यासाठी लोक एकत्र आले होते, मात्र पोलिसांनी ही गर्दी हटवून, यातील काही लोकांना ताब्यात घेतले. आता निषेधाच्या भीतीमुळे मुंबईमधील दक्षता वाढवण्यात आली आहे. याबाबत नुकतेच राज्याच्या गृहमंत्रालयाने एक पत्रक काढून माहिती दिली आहे.
महाराष्ट्र गृहमंत्रालय म्हणते. ‘दिल्लीत नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर, मुंबईमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. आझाद मैदानातील नियुक्त केलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त, मुंबईत अन्य कोणत्याही ठिकाणी निषेधासाठी परवानगी देण्यात येणार नाही.’ या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल जवळील गेट वे ऑफ इंडियाच्या आसपास, मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. लोक व वाहनांची ये-जा रोखण्यासाठी जवळपासच्या रस्त्यांवर ब्लॉकर लावण्यात आले आहेत. (हेही वाचा: CAA Protest: सीएए विरुद्ध बुलडाणा येथे पार पडला सर्वपक्षीय 20 किमी पायी मोर्चा)
दरम्यान, सीएए विरोधात, पूर्वोत्तर दिल्लीत झालेल्या हिंसाचारात हेड कॉन्स्टेबलसह पाच जणांचा मृत्यू आणि किमान 50 जण जखमी झाले आहेत. यामध्ये सैनिक आणि दिल्ली पोलिस दलातील अनेक जवानांचा समावेश आहे. दगडफेकीमुळे हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईमधील परिस्थिती बिघडू नये म्हणून सरकार आणि पोलीस सतर्क झाले आहेत.