6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याने दिले सतर्कतेचे आदेश

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Updates | (Photo Credits: Twitter)

यावर्षी महाराष्ट्रात पावसाने (Heavy Rains) धुमाकूळ घातला होता. नोव्हेंबर आला तरी अजून परीतीच्या पावसाने काढता पाय घेतला नाही. आता भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या पूर्वसुचनेनुसार 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काल कुलाबा वेधशाळेने 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर पश्चिम किनारपट्टीवर समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर समुद्रात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मच्छीमारांनादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याची सूचना दिली गेली आहे. नागरिकांसोबतच प्रशासनानेही या काळात काळजी घ्यावी अशी सूचना दिली गेली आहे. संबंधील जिल्हा यंत्रणेस या सूचना दिल्या गेल्या आहेत. याबाबत आपण कोणत्याही मदतीसाठी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा: 'महा' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या 24 तासात मुंबईसह महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता)

नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबई, उपनगर, नवी मुंबई, पुणे, नाशिक तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस अजून आठवडाभर तरी राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. क्यार वादळाचा प्रभाव कमी होतोय न होतोय तोपर्यंत दुसरे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले आहे. महा नावाचे हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं सरकायचा धोका नसला, तरी त्याच्या प्रभावाने महाराष्ट्रात वादळी पाऊस होत राहणार आहे.