रत्नागिरी: खेड, चिपळूण, दापोलीत पावसाचा हाहाकार; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
या मुसळधार पावसाचा फटका चिपळूण, रत्नागिरी, खेड या भागात बसला आहे
आज (सोमवार, 15 जुलै) सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसाचा फटका चिपळूण, दापोली, खेड या भागात बसला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याने चिपळूण शहरात शिरकाव केला आहे. याचा परिणाम थेट जनजीवनावर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. (नाशिक: कसारा- इगतपुरी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्येही पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत)
मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असून दापोली मार्गही बंद करण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खेडमधील बाजारपेठात आणि घरांमध्येही पाणी शिरले आहे. यामुळे दुकानांचे नुकसान झाले असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यक ते मार्ग बंद करण्यात आले आहेत. तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.