IPL Auction 2025 Live

महाराष्ट्र अजून तापणार, 19 मे पासून येणार उष्णतेची लाट; जाणून घ्या काय असेल तापमान

साधारण 25 मे पर्यंत उष्णतेमध्ये कमालीची वाढ होणार असून, याची सर्वात जास्त झळ मराठवाडा आणि विदर्भाला बसणार आहे.

Heat wave. Representational Image. (Photo Credits: Pixabay)

राज्यावर सूर्य आग ओकत आहे, जनता दुष्काळ, पाणीटंचाई अशा गोष्टींचा सामना करत आहे. मराठवाडा, विदर्भानंतर आता कोकणातही पाण्याची वाणवा निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उष्माघाताचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. अशात आता 19 मे पासून या उष्णतेमध्ये वाढ होणार आहे, असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. साधारण 25 मे पर्यंत उष्णतेमध्ये कमालीची वाढ होणार असून, याची सर्वात जास्त झळ मराठवाडा आणि विदर्भाला बसणार आहे.

वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता)

असे असेल तापमान –

अकोला, नागपूर आणि वर्धा – कमाल 46

चंद्रपूर – 47

धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी – 45

उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. साधारण 18 ते 21 मे दरम्यान मुंबई मधील तापमान वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान 6 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, साधारण 12 जून च्या आसपास महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात होईल.