HDFC Bank Jobs: नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात एचडीएफसी बँक देणार 3,000 हून अधिक लोकांना नोकऱ्या

सध्या बँकेचे नेटवर्क राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि 280 हून अधिक तालुक्यांमध्ये आहे.

HDFC Bank | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) चालू आर्थिक वर्षात (FY23) महाराष्ट्रात आपले नेटवर्क विस्तारण्यासाठी 3,000 हून अधिक लोकांना कामावर घेणार आहे. बँकेने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात राज्यात 207 नवीन बँक शाखा आणि 80 स्मार्ट बँकिंग लॉबी उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बँकेने सांगितले की, नवीन शाखांपैकी 90 शाखा महानगरे आणि शहरी भागात असतील, तर उर्वरित निमशहरी आणि ग्रामीण भागात उघडल्या जातील.

अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, धुळे, जळगाव, मुंबई, नागपूर, नंदुरबार, नाशिक, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि वर्धा या 16 जिल्ह्यांमध्ये स्मार्ट बँकिंग लॉबी असतील, असे बँकेने म्हटले आहे.

एचडीएफसी बँकेचे शाखा बँकिंग प्रमुख अभिषेक देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये बँकेचे क्रेडिट ते ठेवीचे प्रमाण 100 टक्क्यांहून अधिक आहे. सध्या बँकेचे नेटवर्क राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि 280 हून अधिक तालुक्यांमध्ये आहे. त्यात 709 शाखा, 3,200 एटीएम, 1,375 व्यवसाय प्रतिनिधी आणि 15,116 व्यवसाय सुविधा आहेत. बँकेने सांगितले की महाराष्ट्रात त्यांच्याकडे 4.35 ट्रिलियन रुपयांच्या ठेवी आहेत. (हेही वाचा: SBI Job Opportunity: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, करा आजचं अर्ज)

31 मार्चपर्यंत, राज्यातील बँकेचे अॅडव्हान्स 3.28 ट्रिलियन इतके होते. एकूण अॅडव्हान्समध्ये राज्यातील बँकेने ऑफर केलेल्या सर्व कर्जांचा समावेश होतो, ज्यात किरकोळ, कॉर्पोरेट, एमएसएमई आणि मायक्रोफायनान्स कर्जाचा समावेश आहे. दुसरीकडे, खाजगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँक तिच्या सेवेमुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, पंजाब सरकारच्या जलसंपदा विभागाने कर्मचाऱ्यांना एचडीएफसीमध्ये खाते उघडण्यास मनाई केली आहे. इतकेच नाही तर ज्यांचे आधीच एचडीएफसीमध्ये खाते आहे त्यांना ते बंद करण्यास सांगितले आहे.