Haribhau Bagde Political Journey: आरएसएस स्वयंसेवक ते आमदार व्हाया विधानसभा अध्यक्ष आणि आता राज्यपाल, हरिभाऊ बागडे यांचा राजकीय प्रवास

'नाना' म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जाणारे, बागडे हे पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधासभा मतदारसंघातून येतात.

Haribhau Bagde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेते आणि महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांची राजस्थानच्या राज्यपालपदी (Rajasthan Governor) नियुक्ती करण्यात आली आहे. 'नाना' म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जाणारे, बागडे हे पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधासभा मतदारसंघातून येतात. त्यांचा जन्मदेखील याच मतदारसंघातील चित्तेपिंपळगाव (Haribhau Bagde Political Journey) येथे झाला. नुकतीच त्यांना भाजपने राज्यपाल पदाची संधी दिली. ज्यातून भाजपने संदेश दिला की, ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्याला पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. आजच्या पक्षप्रवेशांच्या वातावरणात हा संदेश देणे भाजपसाठी महत्त्वाचे होते हे उल्लेखनीय.

नरेंद्र मोदी यांचा फोन

हरिभाऊ बागडे यांनी राज्यपाल म्हणून संधी मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला. त्यांनी मला काम करण्यासाठी महाराष्ट्राबाहेर जावे लागेल असे सांगितले. कुठे जावे लागेल, काय करावे लागेल हे त्यांनी मला सांगितले नाही. ते पुढे इतकेच म्हणाले की, फक्त इतक्यातच हे इतरांना कोणालाही बोलू नका. उघड करु नका. नंतर थेट माझे नाव राजस्थान राज्याचे राज्यपाल म्हणूनच पुढे आले. मला आव्हाने स्वीकारणे आवडते. पक्षात इतकी वर्षे काम केल्यामुळे कदाचित माझी या पदासाठी निवड झाली असावी," असेही ते पुढे म्हणाले. बागडे यांनी त्यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्याचे श्रेय त्यांचे सहकारी, सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना दिले. (हेही वाचा, New Governors Appointment For Nine States: महाराष्ट्रासह नऊ राज्यांना नवे राज्यपाल; रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन, हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजस्थानच्या गव्हर्नर पदाचा कारभार)

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत

हरिभाऊ बागडे हे 12 किंवा 13 वर्षांचे असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते 1980 पर्यंत जनसंघात होते. ते सांगतात "मी कधीही कोणतेही पद मागितले नाही. पक्षाच्या राज्य नेतृत्वाने राज्यपालपदासाठी माझे नाव सुचवले असावे. मी नव्या नेमणुकीला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन," असे ते म्हणाले. हरिभाऊ बागडे हे सध्या 79 वर्षांचे आहेत. ते 1985 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि पुढे त्यांनी पाच वेळा फुलंब्रीचे प्रतिनिधित्व केले. सन 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यावर त्यांना रोजगार हमी योजनेचे मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले. बागडे यांनी सभापती असताना विरोधकांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याचा आरोप झाला होता. त्यावरुन मोठी टीकाही झाली होती.