Hanuman Chalisa Loudspeaker Row: तिरुपती बालाजीला गेलेले मनसे नेते वसंत मोरे नॉट रिचेबल, 'राज'आज्ञा मोडल्याची चर्चा
एका बाजूला हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेश दिले असतानाच वसंत मोरे मात्र पुण्यात नसल्याचे समजते. चर्चा आहे की, वसंत मोरे तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) गेले आहे. विशेष म्हणजे तिरुपती बालाजीला गेलेल्या वसंत मोरे यांचा फोन नॉट रिचेबल आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेला आदेश पुण्यातील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांना फारसा रुचल्याचे दिसत नाही. एका बाजूला हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेश दिले असतानाच वसंत मोरे मात्र पुण्यात नसल्याचे समजते. चर्चा आहे की, वसंत मोरे तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) गेले आहे. विशेष म्हणजे तिरुपती बालाजीला गेलेल्या वसंत मोरे यांचा फोन नॉट रिचेबल आहे. त्यामुळे वसंत मोरे यांनी 'राज'आज्ञा मोडल्याची चर्चा सुरु झाली आहे. एका बाजूला मनसेचे अनेक नेते हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्यावरुन आक्रमक झाले असताना वसंत मोरे मात्र कोठेच सक्रीय दिसत नाहीत. परिणामी वसंत मोरे यांचे चाललेय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथून गुढी पाडवा मेळाव्यात केल्या भाषणावेळीच वसंत मोरे यांची नाराजी दिसून आली होती. ही नाराजी त्यांनी जाहीरपणेही बोलून दाखवली होती. आपल्या मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्यामुळेच आपण निवडूनही येतो. त्यामुळे पक्षादेश म्हणून राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असली तरी लोकप्रतिनिधी म्हणून पक्षाची भूमिका पार पाडताना अडचणी येतात, अशी नाराजी वसंत मोरे यांनी थेट बोलून दाखवली होती. परिणामी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्या पदावर साईनाथ बाबर यांची तातडीने नियुक्त करण्यात आली. (हेही वाचा, Hanuman Chalisa Loudspeaker Row: पोलिसांची कारवाई सुरु, मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; भोंग्यासह, लाऊडस्पिकर मशीन घेतली ताब्यात)
पदावरुन हकालपट्टी केल्यानंतरही वसंत मोरे यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. आपण राज ठाकरे यांचे खंदे समर्थ आहोत. परंतू, हकालपट्टीचा निर्णय आपल्या जिव्हारी लागल्याचे ते म्हणाले. आपण मनसेतच आहोत. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतू अद्याप त्यांचा संपर्क झाला नसल्याचे त्यांनी त्या वेळी म्हटले होते. दरम्यान, राज ठाकरे आणि वसंत मोरे यांची शिवतीर्थ येथे भेट झाली. त्यानंतर आपण मनसेतच आहोत. आपल्या सर्व शंकांचे निरसण झाल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले होते. आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर मनसे सोडून जाणार नसल्याचंही त्यांनी लागलीच स्पष्ट केले होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमानचालीसा यांवरुन अधिकच आक्रमक भूमिका घेतली. परिणामी वसंत मोरे यांची पुन्हा अडचण झाली. त्यामुळे आता तर मनसे जोरदार आंदोलन करत असताना त्यात वसंत मोरे मात्र कुठेच दिसत नाहीत. आता त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.