Dombivli News : डोंबिवली रेल्वे स्थानकावर चक्क गुजराती भाषेत तिकीट? फोटो होतोय व्हायरल

मात्र, सध्या डोंबिवली स्थानकात प्रवाशाला मिळालेल्या गुजराती तिकीटामुळे मोठी खळबळ माजली आहे. डोंबिवलीकरांमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.

Photo Credit -Twitter

Dombivli News :  महाराष्ट्रात अजूनतरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठी आणि इंग्रजी भाषेतून रेल्वेचं तिकीट मिळतं. मात्र, आता त्याला अपवाद ठरणारी एक घटना समोर आली आहे. मराठी भाषे व्यतिरीक्त आता गुजराती भाषेतून रेल्वेचं तिकीट मिळणार का? (Gujarati language) असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, सांस्कृतीक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात (Dombivli railway station) एकाला चक्क गुजराती भाषेतून तिकीट मिळालं आहे. हे तिकीट डोंबिवली ते घाटकोपर या स्थानकादरम्यानचे असून 8 मार्चला ते प्रिंट झाले होते.  महाराष्ट्रात इतर दुसरी कुठली ही भाषा प्रिंट होऊन न येता फक्त गुजरातीच भाषा कशी आली असेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तिकीट प्रिंट करणाऱ्या यंत्रामध्ये बिघाड झाल्याने असे तिकीट मिळाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय, हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे तिकीट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं असून त्यावरून प्रवाशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. (हेही वाचा:Dombivli News : 'परीक्षा सुरू आहे, स्पीकरचा आवाज कमी करा' सांगितलं, तरूणांनी त्याला धू धू धुतलं, डोंबिवलीतील घटना)

आधीच राज्यातील मोठे उद्योग गुजरातला जात आहेत. राज्यातील नागरिकांना नोकऱ्या मिळत नाहीत. परप्रांतीयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई शहरामध्ये मराठी भाषिकांची संख्या कमी झाली आहे. इतर राज्यातील लोक महत्तावाच्या शहरांमध्ये राहून त्यांची पाळेमुळे वाढवताना दिसत आहेत आणि आता त्यात अशी घटना समोर आल्याने डोंबिवलीकर चांगलेच संतापले आहेत. काहींनी तर त्याचे रेल्वे तिकीटाचे थेट गुजरात कनेक्शन जोडले आहे. मध्य रेल्वे मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करत असतात. येथील डोंबिवली स्थानकातूनही लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्याच डोंबिवली रेल्वे स्टेशनवर मिळालेलं एक तिकीट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याचा फोटोही वेगाने व्हायरल होत आहे.(हेही वाचा:Thane News: उच्चभ्रू परिसरात अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना डोंबिवलीतून अटक, आरोपींकडून अडीच लाख जप्त, परिसरात मोठी खळबळ)

8 मार्चला प्रिंट झालेल्या या तिकीटावरील भाषा गुजराती असल्याचा दावा काही प्रवाशांकडून केला जात आहे. डोंबिवली ते घाटकोपर दरम्यानचे हे तिकीट असून या प्रकारामुळे सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा रंगली आहे. गुजराती भाषेतील या तिकिटाविषयी काही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

गुजराती भाषेतील तिकीटामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप आणि महायुतीचे समर्थक हे मात्र, ते तिकीट गुजराती भाषेत नसल्याचा दावा करत आहेत. तिकीट प्रिंट करणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने असे तिकीट प्रवाशांना मिळाले असावे, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. तसेच हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.