Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Live News Update: नांदगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, नितेश राणे यांनी गड राखला
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Live Update : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला होता. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला होता.
भाजप आमदार नितेश राणे यांनी गड राखल्याचे वृत्त आहे. नांदगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि पॅनलवर बहुमताने विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे.
फेविक्विक प्रकरणी चर्चेत आलेल्या लिंबागणेश ग्रामपंचायतीची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. आकराव्या फेरी अखेर या ग्रामपंचायतीची मतमोजणी घेतली जाणार होती. परंतू, निवडणूक आयोगाकडून कोणताही निर्णय आला नसल्याने या ग्रामपंचायतीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. आयोजाच्या निर्णयाबाबत सर्वांणाच उत्सुकता आहे.
शिवसेनेमध्ये कितीही गद्दारी झाली. अनेक गद्दार फुटून गेले तरीही कट्टर कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सरशी होत आहे. शिंदे गटासोबत असलेल्या गद्दार आमदारांसोबत केवळ पैसेवाले लोक राहिले आहेत. जे पैसे घेऊन काम करतात. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी पोटाला चिमटा काढून निवडणुका लढवल्या आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि मविआमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. जाहीर झालेल्या एकूण निकालांपैकी आकडेवारी खालील प्रमाणे
मविआने जिंकलेल्या ग्रामपंचायती- 1542
भाजपने जिंकलेल्या ग्रामपंचायती- 1553
भाजप, मविआ सोडून इतरांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती- 602
गोंदिया जिल्ह्यातील बोदरा ग्रामपंचायत निवडणुकीत सासू सुनेमध्ये चुरशीची लढत झाली. या लढतीत सुनेने बाजी मारली. अत्यंत चुरशीच्या लढतीत सासूचा निसटता पराभव झाला. तर अवघ्या काहीमतांच्या फरकाने सुनेने निसटता विजय मिळवत बाजी मारली. परिसरात या निकालाची जोरदार चर्चा सुरु आहे.
इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला पवार निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अहमदनगर मध्ये तालुक्यातील निळवंडे गावात त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
गुहागरच्या आरे ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटातून उभ्या असलेल्या 'लेकी' वर ठाकरे गटातील 'आई'चा विजय झाला आहे. सुवर्णा दीनानाथ भोसले यांच्यासमोर त्यांची मुलगी प्राजक्ता प्रसाद देवकर चे आव्हान होते. मागास प्रवर्ग (महिला) साठी ही जागा राखीव होती.
आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे तर सरपंच पदी हिराबाई पडळकर निवडून आल्या आहेत.
सिंधुदुर्ग मधील वैभववाडी मध्ये भाजपाचं17 पैकी 14 ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे. निवडणूक प्रचारांच्या वेळेस नितेश राणेंनी धमकी वजा सज्जड दम दिलेल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता.
कोल्हापूर मध्ये सतेज पाटील यांचंच वर्चस्व पहायला मिळालं आहे. कोल्हापूरातील पाचगाव मध्ये पाटीलांना विजय मिळाला आहे. या ग्रामपंचायतीचा निकाल विधानसभेवर प्रभाव टाकत असल्याने या ग्रामपंचायतीकडे सार्यांचे लक्ष लागले होते.पण पाचगाव मध्येही सतेज पाटीलांनी बाजी मारली आहे. धनंजय महाडिकांचा कोल्हापूरातील सत्तांतराचा प्रयत्न फेल गेला आहे.
नागपूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात चकीत करणारा निकाल पहायला मिळाला आहे. या गावात राष्ट्रवादीचा सरपंच विजयी झाला आहे पण पॅनल मात्र भाजपाचं निवडून आलं आहे.
कर्नाटक सीमेजवळील शेनोळी गावात शिंदे गटाला धक्का बसला आहे. या गावात एनसीपी ने जिंकल्या 9 पैकी 7 जागा जिंकल्या आहेत. या गावात शिंदे गटातील मंत्री शंभुराजेंनी प्रचारसभा घेतल्या होत्या.
'आमचीच सरशी...' म्हणत ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये भाजपाच्या मोठ्या विजयाचा पंकजा मुंडे यांचा दावा आहे. त्यांनी या विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. बीड मध्ये अनेक कठीण ग्रामपंचायतींवर मिळवलेला विजय याचं त्यांनी कौतुक केले आहे.
'शिवशक्ती-भिमशक्ती आघाडी'ची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. या नव्या आघाडीचे नंदकिशोर गोरले विजयी ठरले आहेत. सार्या 7 जागा 'शिवशक्ती-भिमशक्ती आघाडी'ने जिंकल्या आहेत.
एनसीपी आमदार संदिप क्षीरसागर यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणूकीत काकांना धोबीपछाड दिला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत नवगन राजुरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली आहे.
रायगड मध्ये शिंदे गटाचा सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये बोलबाला पहायला मिळाला आहे. आतापर्यंत 21 सरपंच विजयी झाले आहे. येथून महेश गोगावले हे शिंदे गटाचे आमदार आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीला बॅलेट पेपर द्वारा करण्यात आलेल्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल (Gram Panchayat Election Result) आज जाहीर होणार आहे. राज्यामध्ये सुमारे 7135 ग्रामपंचायतींचं भविष्य ठरणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून या निवडणूकांसाठी मतमोजणी सुरू होणार आहे. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदारांनी कुणाचा बाजूने कौल दिला आहे याचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान मतमोजणीच्या वेळीस कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिसफाटा तैनात करण्यात आला आहे.
34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत 18 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झालं.616 गावांमध्ये बिनविरोध निवडणूका झाल्या आहेत. दरम्यान एकूण सरासरी 74% मतदान झाल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सरपंचाची थेट निवड करण्याचा नियम लागू केला आहे. त्यामुळे आता सदस्य निवडीसोबतच सरपंच देखील आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे अनेकांचा प्रयत्न हा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता आली नाही तरी सरपंच निवडून आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. Maharashtra Gram Panchayat Election 2022 Results Live Streaming: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे TV9 Marathi वर पहा थेट प्रक्षेपण .
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला होता. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)