BS Koshyari: नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं स्पष्टीकरण

सर्वस्तरातील घणाघात बघता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Governor Bhagat Singh Koshyari (Photo Credit - Twitter)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतील (Mumbai) मराठी माणसाबाबत पुन्हा स्फोटक विधान केलं आहे. गुजराती (Gujrati) आणि राजस्थानी (Rajasthani) निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी (Economical Capital) राहणार नाही असं खळबळजनक वक्तव्य भगसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. तर विरोधक ही आक्रमक झाले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेसह विविध राजकीय पक्षांकडून राज्यपालांवर हल्लाबोल केला जात आहे. सर्वस्तरातील घणाघात बघता संबंधीत वक्तव्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी (Marathi) माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहे. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे. (हे ही वाचा:- BS Koshyari Controversial Statement: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गट केंद्र सरकारकडे तक्रार करणार)

 

तसेच राज्यपाल कोश्यारींनी दिलेल्या स्पष्टीकरणात नमूद केले आहे की मुंबई (Mumbai) महाराष्ट्राचा (Maharashtra) स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी (Economical Capital) सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. काल राजस्थानी (Rajasthani) समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती (Gujrati) आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात (India) आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.