Gold Rate: धनत्रयोदशीपूर्वी सोनं महागणार; प्रति दहा ग्रॅम 40,000 रुपयांपेक्षाही अधिक होण्याची शक्यता
त्यानंतर लगेचच लग्नसराईसुद्धा सुरु होत आहे. त्यामुळेही स्थानिक सराफा बाजारात तेजी पाहायला मिळू शकते.
स्थानिक सराफा बाजारात (Domestic Sarafa Market) सोने आणि चांदी धातूच्या दरात पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पितृपक्ष समाप्त होताच 29 सप्टेंबरपासून नवरात्र सुरु होत आहे. नवरात्र आणि दसरा उत्सवापासून पुढे सोने खरेदीला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सोने आणि चांदी दरावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार सोने दर (Gold Rate) पुन्हा एकदा प्रति दहा ग्रॅम 40,000 रुपये इतक्या उंचीवर जाण्याची शक्यता आहे. कमोडिटी बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आगामी काळात भारतीय बाजारात 40 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम दराने किंवा त्याहूनही अधिक दराने विकले जाऊ शकते. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात हेच दर (सोने) 1,500-1,600 डॉलर प्रति औंस असे पाहायल मिळू शकतात.
दरम्यान, स्थानिक सराफा बाजारात सोने नुकतेच प्रति दहा ग्रॅम 40,000 रुपये इतक्या उच्चांकी स्थानी पोहोचले होते. केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या व्यापारयुद्धामुळे आणि आखाती क्षेत्रात सुरु असलेल्या भूराजकीय तणाव ( जियोपॉलिटिक टेंशन ) आदी कारणांमुळे सोने दरात मोठी वाढ होऊ शतते. त्यातच भारतात दिवाळी प्रामुख्याने धनत्रयोदशी हा सोने खरेदीसाठी प्रमुख मुहूर्त म्हणून ओळखला जातो. त्याचाही परीणाम स्थानिक बाजारावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेही सोने, चांदी दरात वधारलेपण पाहायला मिळू शकते.
जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड काऊन्सीलचे ऑफ इंडियाचे अध्यक्ष शांती पटेल यांनी म्हटले आहे की, नवरात्रापासून सुरु असलेली सोने खरेदी पुढे धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत पुढे पाहायला मिळते. त्यानंतर लगेचच लग्नसराईसुद्धा सुरु होत आहे. त्यामुळेही स्थानिक सराफा बाजारात तेजी पाहायला मिळू शकते. (हेही वाचा, दर वाढल्याने सोने विक्री 65 टक्क्यांनी घटली; रिसाइक्लिंग मोठ्या प्रमाणावर वाढले)
सर्वसाधारणपणे पाहायचे तर कोणतीही वस्तू स्वस्तात उपलब्ध असते तेव्हा लोक ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. परंतू, सराफा बाजारात काहीसे या उलट पाहायला मिळते. सर्वसामान्य बाजारपेठेचा नियम इथे लागू पडत नाही. इथे सोनं महाग होणार अशी शक्यता दिसली की लोक खरेदीसाठी अधिक घाई करतात. मात्र, अतीमहागाईचा नाही म्हटले तरी सराफाबाजारातील व्यवहारावर परीणाम झालेला पाहायला मिळते.