महाराष्ट्र: मुलाने दिली चिठ्ठी; दहावितील मुलीची आत्महत्या
Girl commits suicide | (Photo courtesy: archived, edited, representative image)

लहान मुलाच्या माध्यमातून अज्ञात मुलाने चिठ्ठी दिल्याने आपमानित झाल्याची भावना मनात धरुन एका मुलीने थेट गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पंढरपूर (Pandharpur)शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना पंढरपूर तालुक्यातील वाखरी गावात (Wakhari Village in Pandharpur Taluka) घडली. बुधवारी (23 जानेवारी) घडली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या मुलाने मुलीस चिठ्ठी दिली त्याच्यावर गुन्हा दाखल करा या मागणिसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशनबाहेर जमले होते.

आत्महत्या केलेली विद्यार्थीनी वाखरी येथील माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ट महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती आहे. एका लहान मुलाच्या माध्यमातून अज्ञात मुलाने तिला चिठ्ठी दिली होती. चिठ्ठमध्ये नेमका काय मजकूर होता याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, शिक्षकांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली. तसेच, तिच्या पालकांनाही शाळेत बोलवून घडल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर ही मुलगी तिच्या घरी गेली होती.

दरम्यान, त्याच दिवशी मुलीचे वडील नेहमीप्रमाणे जेवण करुन कामावर निघून गेले. त्यानंतर मुलीने घरातील खोलीत मुलीने स्वत:ला कोंडून घेतले. बराच काळ ती बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या बहिणीने दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने तातडीने वडिलांना बोलावून घेतले. घरी पोहोचल्यावर वडिलांनी शेजारी आणि इतर ग्रामस्थांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. तर, समोर धक्कादायक चित्र दिसत होते. मुलीने गळफास घेतला होता. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा, प्रेयसीच्या पैंजणानं फोडली पापाला वाचा, प्रियकर गजाआड; नालासोपारा येथील घटना)

या प्रकारानंतर मुलीचे नातेवाईक आणि संतप्त ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. तसेच मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा रात्री उशीरा दाखल केला.