लेखिका गिरीजा कीर यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Girija Keer | Photo credits: Twitter/ ddsahyadrinews

ज्येष्ठ लेखिका, अनुराधा मासिकच्या माजी सहाय्यक संपादिका गिरीजा कीर (Girija Keer)

यांचं आज (31 ऑक्टोबर) मुंबईमध्ये निधन झालं आहे. वांद्रे येथील राहत्या घरी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराशी लढत असलेल्या गिरीजा कीर यांचे आज निधन झाले. मराठी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, बालसाहित्य, प्रवासवर्णनं आणि मुलाखती अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी विशेष योगदान दिलं आहे. गिरिजा कीर यांचा जन्म धारवाड येथील आहे. मात्र त्यांचं शिक्षण मुंबईमध्ये झालं. मुंबई विद्यापीठाची बी. ए. झाल्याानंतर गिरिजा कीर यांनी लेखनाला सुरुवात केली. शिक्षिका म्हणून देखील त्यांनी सुरूवातीच्या वेळेस काम केले आहे.

गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेद, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभाग, झपाटलेला आदी कांदबऱ्या विशेष गाजल्या आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं त्यांनी लिहली आहेत. गिरिजा कीर यांच्या निधनामुळे साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. प्रामुख्याने कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासींचं जीवन त्यांनी जवळून अनुभवलं आहे. तसेच 'जन्मठेप' हे पुस्तक त्यांनी 6 वर्षं येरवडा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या कैद्यांवर संशोधन करून लिहिलं आहे.

साहित्य विश्वातील त्यांच्या कामगिरीचा गौरव मसापचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाच्या कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री साहित्यिका पुरस्कार यांनी करण्यात आला आहे.