Ghodbunder Road Traffic Jam: मुख्यमंत्री साहेब काहीतरी करा हो!, घोडबंदर रोडवरील ट्रॅफीकला कंटाळलेल्या नागरिकांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

त्यामुळे नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे समस्या सोडविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करत आहेत.

Ghodbunder Road Traffic Jam | (Photo Credit - X)

ठाणे शहर (Thane Traffic) आणि परिसरातील सर्व रस्ते वाहतूक कोंडीची राजधानी ठरु पाहात आहेत. घोडबंदर रोड (Ghodbunder Road Traffic) हा तर जवळपास दररोजच वाहतूक कोंडीचा शिकार झालेला असतो. नेहमीची वाहतूक कोंडी आता नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. परिणामी नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडेच मदतीची मागणी केली आहे. अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे या वाहतुकीचे काहीतरी करा, जेणेकरुन लोकांना मोकळा श्वास आणि सुखकर प्रवास करता येऊ शकेल, अशी मागणी केली आहे. पाटीलपाडा येथील पुलाजवळ रसायनांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानंतर उद्भवलेली कोंडी फोडल्याला एकच दिवस उलटला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीच परिस्थीती निर्माण झाल्याने नागरिकांच्या संतापाला पारावार राहिला नाही.

नागरिकांचा संताप, कर्मचाऱ्यांचे हाल

ठाणे-बोरिवली रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याकडून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवासी आणि चाकरमान्यांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना मनस्ताप आणि नोकरदार वर्गास कार्यालयात जाण्यास उशीर होत आहे. हे नागरिक जड वाहनांवर निर्बंध घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती करत आहेत. घोडबंदर रोड वापरुन कार्यालयात जाणारे अनेक लोक बस, रिक्षा सोडून मध्येच प्रवास थांबवत आहेत आणि पर्यायी मार्ग शोधत आहेत. काहींनी तर चालत निघाले असून ते पायीच कार्यालय जवळ करु पाहात आहेत. काहींनी 'वर्क फ्रॉम होम' पर्याय निवडत घरुनच काम सुरु केले आहे. (हेही वाचा, Ghodbunder Road Traffic Jam: घोडबंदर रोडवर ट्रॅफीक जाम, नागरिकांचा संताप)

ट्रॅफीकमध्ये बस अडकल्या, थांब्यांवर प्रवाशांची गर्दी

अनेक बस रस्त्यावरच ट्रॅफीकमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे बसमधील प्रवाशांचा खोळंबा झालाच आहे. दुसऱ्या बाजूला बस न आल्याने बस थांब्यांवरही तेवढीच गर्दी वढली आहे. अनेक लोक बसची वाट बघून कंटाळले आहेत. कामचा खोळंबा झाल्याने मनस्ताप सहन करत प्रशासनाला शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे हिरानंदानी आणि ब्रह्मांड ते ठाणे या टीएमटी बससेवेवरही परिणाम होत आहे. टीएमटीच्या अनेक बस आधीच ट्रॅफिकमध्ये अडकल्या आहेत, त्यामुळे ठाणे स्थानकापर्यंत मोजक्याच सेवा सुरू आहेत. आर-मॉल बसस्थानकावर लोक टीएमटी बसची वाट पाहत आहेत. (हेही वाचा, Thane: घोडबंदर रोडवर मोटारसायकलची खांबाला धडक; दुचाकीला आग लागल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

मुख्यमंत्र्यांसाठी लाजीरवाणी स्थिती

अर्चित घांगुर्डे नावाच्या एका एक्स यूजरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत लिहीले आहे की, सलग दुसऱ्या दिवशी घोडबंदर रस्ता वाहतुकीने पूर्णपणे ठप्प आहे. गेल्या 1 तासात मी वाघबीळ ते पाटलीपाडा फ्लायओव्हर येथे 2km अंतरावर आलो आहे. विशेषत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाण्यात राहतात त्यांच्यासाठी ही लाजीरवाणी परिस्थीत आहे.

वाहतूक व्यवस्थापनात पूर्ण अपयश

धवल जाधव नावाच्या वापरकर्त्याने X (पुर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहीले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात, स्वत:च्या घरच्या अंगणात काय चाललं आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूक व्यवस्थापनाचे संपूर्ण अपयश. वाघबीळ येथे मी पाठिमागील एक तासापासून अडकलो आहे.

कोंडीचे काहीतरी करा

हिना पाटले नावाच्या महिला प्रवाशाने सोशल मीडियावर लिहीले आहे की, ठाण्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आहे. या वाहतूक कोंडीचे काहीतरी करायला हवे. त्यांनी आपली पोस्ट मुख्यमत्र्यांच्या अधिकृत एक्स हँडललाही टॅग केली आहे.

दरम्यान, घोडबंदर रोडवरील पाटलीपाडा परिसरात एक ट्रक उलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ज्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली. ही कोंडी कशीतरी सोडवली. लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशीही नागरिकांना प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.