मध्य रेल्वेच्या विस्कळीत कारभारामुळे प्रवासी त्रस्त, घाटकोपर, ठाण्यात 5 जण जखमी
मध्य रेल्वे (Central Railway) च्या घाटकोपर (Ghatkopar) स्थानकात ट्रेन मधून उतरत असताना महिलांच्या डब्यावर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये दोन तरुणींना दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. जखमी तरुणींना तातडीने राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital)दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत,दरम्यान मध्य रेल्वेवर सध्या वाहतूक सुरु झाली असली तर वेळापत्रक मात्र विस्कळीतच आहे. उशिराने येणाऱ्या ट्रेनमुळे जवळपास सर्वच स्थानकांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. घाटकोपर येथे देखील खूप गर्दीमुळे ट्रेनच्या डब्यावर दगड मारणाऱ्या माथेफिरुंचा शोध घेणे अद्याप शक्य झाले नाही, मात्र या प्रकरणी रेल्वे पोलिसांचा तपास सुरु आहे.
दरम्यान,मध्य रेल्वेवरील मुंब्रा-कळवा स्थानकादरम्यान देखील गर्दीनं खचाखच भरलेल्या एका लोकलमधून तिघे जण पडल्याचे वृत्त समजत आहे. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तिघांनाही उपचारासाठी कळव्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.नाजिमा शेख असं जखमी महिलेचं नाव आहे. अन्य दोघांची नावं कळू शकलेली नाहीत. तर ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दीच्या रेट्यामुळं काही महिला प्रवासी गुदमरल्याचं वृत्त समोर आलं आहे. रेल्वे पोलिसांनी एका महिलेला वेळीच बाहेर काढल्यानं अनर्थ टळला.