Ganpat Gaikwad Firing Case: गणपत गायकडवाडांच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर घोषणाबाजी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात शनिवारी हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला.

भाजप आमदार गणपत गायकवाड  (Ganpat Gaikwad) यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली होती. मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून उल्हासनगरमधील (Ulasnagar) सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे सगळे कार्यकर्ते गोळीबार प्रकरणी आरोपी असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनासाठी उल्हासनगरच्या कोर्टाबाहेर घोषणाबाजी करत होते.  'कोण आला रे कोण आला, कल्याणचा वाघ आला',भारतीय जनता पार्टीचा विजय असो, 'गणपत शेठ आगे बढो, हम तुम्हारे साथ है', गरीबों का नेता कैसा गणपत शेठ जैसा अशा प्रकारच्या घोषणा कोर्टाच्या बाहेर देण्यात आल्या.  (हेही वाचा - Ganpat Gaikwad Atrocity Case: भाजप आमदार गणपत गायकवाड विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल)

आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात शनिवारी हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. त्यामुळे भाजपाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांवरती उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान जमिनीच्या संबंधित वादामुळे हा गोळीबार झाल्याचं समोर आलं. शुक्रवारी हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात होता. मात्र पोलीस काही कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी थेट शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.