Gangster Ejaz Lakdawala: गँगस्टर एजाज लकडावाला डासांनी हैराण, कोर्टात घेऊन आला मेलेल्या डासांनी भरलेली बॉटल

तुरुंगातअसलेला लकडावाला सध्या डासांमुळे हैराण आहे. इतका की तो चक्क एक मेलेल्या डासांनी भरलेली बॉटल घेऊनच कोर्टात पोहोचला.

Ejaz Lakdawala | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा एकेकाळचा जवळचा साथीदार गँगस्टर एजाज लकडावाला (Gangster Ejaz Lakdawala) सध्या तुरुंगात आहे. तुरुंगातअसलेला लकडावाला सध्या डासांमुळे हैराण आहे. इतका की तो चक्क एक मेलेल्या डासांनी भरलेली बॉटल घेऊनच कोर्टात पोहोचला. चावणाऱ्या मच्छरांमुळे आपण प्रचंड हैराण असल्याचे सांगत त्याने मच्छरदानी देण्याची अथवा खिडक्यांना जाळी लावण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्याची ही मागणी गुरुवारी फेटाळून लावली.

लकडावाला हा फरारी डॉन दाऊद इब्राहिमचा माजी सहकारी आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहे. त्याला जानेवारी 2020 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो नवी मुंबईतील तळोजा कारागृहात बंद आहे. (हेही वाचा, दाऊद इब्राहिम याचा गेम दरग्याबाहेरच केला असता पण, नेपाळच्या खासदाराने घोळ केला, एजाज लकडावाला याची मुंबई पोलिसांना माहिती)

एजाज लकडावाला याने मच्छरदाणी वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात नुकताच अर्ज केला होता. लकडवाला यांने आपल्या अर्जात म्हटले आहे की 2020 मध्ये जेव्हा त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तेव्हा त्याला एक मच्छरदानी वापरण्याची परवानगी होती. परंतु या वर्षी मे महिन्यात कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव जाळे जप्त केले.

गुरुवारी लकडावाला यांला सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांने मृत डासांनी भरलेली प्लास्टिकची बाटली दाखवून तळोजा कारागृहातील कैद्यांना दररोज या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. मात्र तुरुंग प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत याचिकेला विरोध केला. दरम्यान, न्यायालयाने अर्ज फेटाळताना सांगितले की, आरोपी अर्जदार (लकडावाला) ओडोमास आणि डासांपासून बचाव करणारी इतर औषधे वापरू शकतो.