Ganeshotsav 2020: मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे किंवा घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी BMC ने जाहीर केल्या विशेष सूचना

मात्र सध्या देशात कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट असल्याने हा उत्सवही अगदी साधेपणाने साजरा होणार आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये तर गणपती उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते.

गणपती विसर्जन (Photo credits: Wikimedia Commons)

गणेशोत्सव (Ganeshotsav 2020) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र सध्या देशात कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट असल्याने हा उत्सवही अगदी साधेपणाने साजरा होणार आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये तर गणपती उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. गणेश चतुर्थी व गणपती विसर्जन या दोन दिवशी तर मुंबईमध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाबाबत मुंबई महानगरपालिकेने (BMC) काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याआधी ठाणे महानगरपालिके (TMC) कडूनही काही सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांचे किंवा घरगुती गणेशमूर्त्यांचे विसर्जन करणा-या भाविकांसाठी या विशेष सूचना आहेत.

बीएमसीने माहिती दिल्यानुसार, मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत व यावर्षी मागील वर्षीच्या पाच पटीने अधिक म्हणजेच, 167 कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. तसेच, सोसायट्यांच्या आवारात कन्टेनमेंट झोनमध्ये तात्पुरती विसर्जन स्थळे तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे देखील तयार करण्यात आली आहेत. ही बाब विचारात घेता, या वर्षी कोविड 19 साथरोगाची परिस्थिती लक्षात घेता गणेशमूर्तीचे विसर्जन हे पूर्णतः गर्दी टाळून करणे बंधनकारक राहील.

> या वर्षी फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्रेदेखील विभाग स्तरावर सुरु करण्यात येणार आहेत.

> नैसर्गिक विसर्जनस्थळे तसेच कृत्रिम विसर्जन स्थळे यांच्यापासून 1 ते 2 कि.मी. च्या परीघात रहाणा-या लोकांनीच शक्यतो त्यांचा वापर गणपती विसर्जनासाठी करावयाचा आहे. अशा नैसर्गिक विसर्जनस्थळांवरदेखील नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. अशा स्थळांवर मूर्ती संकलनाची व्यवस्था त्या त्या विभाग कार्यालयामार्फत करण्यात येईल. नागरिकांनी तेथे मूर्ती जमा कराव्यात व त्यांचे विसर्जन महापालिकेमार्फत करण्यात येईल.

> बाकी सर्व नागरिकांसाठी प्रत्येक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागामध्ये किमान 7 ते 8 मूर्ती संकलन केंद्रे सुरु करावीत. ही केंद्रे रिकामी मैदाने, काही सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप तसेच विभाग कार्यालये अशी विविध ठिकाणी असू शकतात. अशा संकलन केंद्रांना केंद्र ची पूर्वप्रसिध्दी पुरेशा प्रमाणात प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे व लोकप्रतिनिधींमार्फत करण्यात यावी.

बीएमसी ट्वीट -

> नागरिकांना असे आवाहन महानगरपालिकेतर्फे तसेच विभागांव्दारे करण्यात यावे की, त्यांनी विसर्जनापूर्वीची पूजा, आरती ही प्रक्रिया घरीच पूर्ण करुन सामाजिक अंतर व अन्य मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गर्दी न करता गणेशमूर्ती संकलन केंद्रात जमा कराव्यात. त्यानंतर महानगरपालिकेतर्फे या सर्व मूर्तीचे विधीवत विसर्जन केले जाईल. (हेही वाचा: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून मार्गदर्शक सुचना जाहीर)

> श्री गणेशाचे आगमन दि.22.8.2020 रोजी होणार आहे. घरगुती गणपतींचे आगमन हे प्रतिवर्षी प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी किंवा त्याचदिवशी मोठया प्रमाणावर केले जाते. यावर्षी कोविड 19 साथ रोगाची परिस्थिती लक्षात घेता मूर्तीच्या आगमनाच्यावेळी रस्त्यांवरील गर्दी टाळणे बंधनकारक आहे त्यामुळे गणेशमूर्तीचे आगमन गणेशचतुर्थी दिवसाच्या 3 ते 4 दिवस आधीपासूनच करण्याचे आवाहन विभाग कार्यालयांव्दारे लोकप्रतिनिधी व अन्य माध्यमातून नागरिकांना करण्यात यावे.

तर अशाप्रकारे बीएमसीने गणपतींचे आवाहन व विसर्जन यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif