गडचिरोली: पर्लकोटा नदीला मागील 15 दिवसांत तिसर्‍यांदा पूर; 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटल्याची भीती

मागील 15 दिवसांमध्ये तिसर्‍यांदा भामरागड तालुक्याला पूराचा फटका बसल्याने दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Bhamragad Flood (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामध्ये कोकण, कोल्हापूर, सांगलीप्रमाणे विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आता गडचिरोलीमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या भागामध्ये पर्लकोटा, प्राणहिता, गोदावरी, बंडिया, पामुलगौतम या नद्यांना पूर आला आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. पर्लकोटा नदीच्या पूरामुळे (Parlkota River Flood) भामरागड भागात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मागील 15 दिवसांमध्ये तिसर्‍यांदा भामरागड तालुक्याला पूराचा फटका बसल्याने दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. Maharashtra Monsoon Update 2019: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

गडचिरोलीत मागील काही तासांपासून कोसळणार्‍या पावसामुळे 100 गावांचा संपर्क तुटल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अहेरी तालुक्यातल्या जिमलगट्टा ते देचलीपेठा दरम्यान किस्टापूर नाल्याला पूर आल्याने देखील 25 गावांचा संपर्क तुटला आहे.

गडचिरोली मधील पूर परिस्थिती

सध्या कोल्हापूर, सातारा, सांगली मध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफसोबत सैन्याची मदत घेण्यात आली आहे. पाणबुडी आणि एअरलिफ्टच्या मदतीने नागरीकांची पूराच्या पाण्यातून सुटका केली जात आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर असली तरीही प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोकण, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे या भागात तुफान पाऊस बरसत असला तरीही मराठवाडा मात्र अद्याप पावसाच्या प्रतिक्षेत आहे.