Gadchiroli Accident: सुरजागड लोहखनिज प्रकल्पात उत्खनन करणारं वाहन खाली असलेल्या जीपवर कोसळलं, तिघांचा मृत्यू
अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने अहेरी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केलं.
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सुरजागड लोह प्रकल्पाच्या (Surjagarh Mining Project) खाणीत घडलेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पात ही घटना घडली. मृतकांमध्ये सोनल रामगीरवार (वय 26) यांच्यासह हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरियाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरु आहे. या पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली कोसळलं, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळलं. तिथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - The Burning Car: दादर परिसरात भरधाव कारला आग, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही)
दरम्यान या घटनेनंतर या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने अहेरी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केलं.
सुरजागड टेकडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरु आहे. इथे सुरु असलेल्या बेदरकार अवजड वाहतुकीमुळे लोकांचा नाहक बळी गेल्याच्या घटना या पुर्वी देखील घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी स्थानिक पोलिसांच्याकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न झाला पंरतू परिसरात तणावाचा वातावरण पहायला मिळाले. यापुर्वी 14 मे रोजीच घडलेल्या एका अपघातात एका 12 वर्षीय मुलीला आपले प्राण गमवावे लागले होते.