गडचिरोली: पावसात अडकली रुग्णवाहीका, एटापल्ली येथील घनदाट जंगलात झाडाखालीच 'ती' झाली बाळंत
स्त्री जातीचे नवजात अर्भक, बाळंतीन यांना घेऊन पुढील उपचारासाठी गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका मुसळधार पाऊस, चिखल आणि उपलब्ध नसलेला रस्ता यामुळे वेळेत पोहोचू शकली नाही. परिणामी गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील घनदाट जंगलात एका महिलेला झाडाखाली आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. भारती सुरज दोरपेटी (Bharti Dorpeti) असे झाडाखाली प्रसुत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या झारेवाडा येथील रहिवासी आहेत. सध्या भारती दोरपेटी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ आणि बाळंतीन यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आरोग्य सेविकेने दिली आहे.
प्राप्त माहतीनुसार, गट्टा आरोग्य केंद्र हद्दीतील झारेवाडा गावातील रहिवासी भारती सुरज दोरपेटी या गर्भवती होत्या. प्रसुती काळ नजीक आल्याने 12 ऑगस्ट या दिवशी त्यांना पोटदुखी सुरु झाली. ही पोटदुखी म्हणजे प्रसववेदना असल्याचे ध्यनात येताच गावात आरोग्य सेविका म्हणून काम करत असलेल्या सविता आलाम यांनी गट्टा आरोग्य केंद्राला माहिती दिली.
आरोग्य सेविकेकडून माहिती मिळताच गट्टा येथील आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका सोनी दुर्गे, आशा सेविका सविता आलाम व रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिका घेऊन निघाले. परंतू, मुसळधार पावसामुळे गिलनगुडा नाल्याला पूर आला होता. हा नाला दुथडी भरुन वाहत होता. शिवाय हे पाणी रस्त्यांवरुनही वाहता होते. सर्व रस्ताच चिखलामुळे निसरडा झाला होता. हे कमी की काय म्हणून रस्त्यावरील चिखलात एक ट्रकही फसला होता. पुढे जाण्यासाठी पर्यायी रस्ताही नव्हता. त्यामुळे रुग्णवाहीकेला भारती सुरज दोरपेटी यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण होऊ बसले. (हेही वाचा, उत्तर प्रदेश: सीतापूर येथील मौसम देवी हिने दिला 4 बाळांना जन्म; घरासमोर बघ्यांची गर्दी)
दरम्यान, गावातील काही कर्मचाऱ्यांनी प्रसववेदनेत असलेल्या भारती सुरज दोरपेटी यांना खाटेवर टाकून रुग्णवाहिकेकडे कूच केले. घनदाट जंगलातून रस्ता काढत ते रुग्णवाहिका उभी असलेल्या मुख्य रस्त्याकडे निघाले. मात्र, भारती सुरज दोरपेटी यांच्या प्रसववेदना अधिकच तीव्र झाल्या. त्यामुळे आता पुढे जाणेच शक्य नाही हे ध्यानात येताच आरोग्य सेविका सोनी दुर्गे व आशा सेविका सविता आलाम यांनी प्रसुतीसाठी लागणाऱ्या आपल्या साहित्यासह जंगलातच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला.
भारती सुरज दोरपेटी यांनी एटापल्ली जंगलातील एका झाडाखाली बाळाला जन्म दिला. स्त्री जातीचे नवजात अर्भक, बाळंतीन यांना घेऊन पुढील उपचारासाठी गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.