'त्या' वक्तव्यावरून भाजपकडून शरद पवार यांना 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पत्र पाठवले जाणार
तसेच शरद पवार यांना प्रभु श्री रामाची आठवण करून देण्यासाठी त्यांना जय श्री राम लिहलेले 10 लाख पत्र पाठवले जाणार असल्याचे भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) म्हणाले आहेत
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून (Ram Mandir Bhumi Pujan) केलेल्या विधानानंतर भाजपचे अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्हाला वाटते की कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून करोना जाईल”,असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला होता. शरद पवार यांच्या व्यक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा यांनी निषेध करीत पवार यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तसेच शरद पवार यांना प्रभु श्री रामाची आठवण करून देण्यासाठी त्यांना जय श्री राम लिहलेले 10 लाख पत्र पाठवले जाणार असल्याचे भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) म्हणाले आहेत. या आंदोलनाची सुरुवात पनवेल येथून करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला पार पडणार आहे. दरम्यान, दुसरीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर आता भाजप युवा मोर्चाने आक्रमक भुमिका घेतली आहे. श्री राम मंदीर ही देशाची, भाजपाची अस्मिता आहे. मंदीराच्या भूमिपुजनावरून देशात आनंदाचे वातावरण असताना शरद पवार यांनी सदरचे व्यक्तव्य म्हणजे एखाद्या समाजाला खुश करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपा युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे. शरद पवार यांना श्री रामाची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील घरी राज्यभरातून 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याची सुरवात पनवेल येथून केली आहे. हे देखील वाचा- 'मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठुरायाकडे साकडे का घातले?' राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या राम मंदिरावरील टीकेला विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर
कोरोना विषाणू फैलावाच्या परिस्थिती व सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार रविवारी सोलापुरात गेले होते. आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कोरोना संकटाच्या मुद्यावर मोदी सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, ते म्हणाले की, "कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचे संकट दूर होईल, असे काही मंडळींना वाटते आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर, भूमिपूजन अवश्य करा. फक्त कोरोनाचे संकट दूर व्हावे, हीच आमची इच्छा आहे", असे शरद पवार म्हणाले होते.