रिक्षावाला ते शिवसेना विधिमंडळ नेता... महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेले Eknath Shinde यांचा संपूर्ण प्रवास वाचून तुम्हीही व्हाल थक्क

एक सामान्य रिक्षावाला ते शिवसेना नेता असा प्रवास गाठणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील प्रवास नेमका कसा आहे तो पाहूया.

Eknath Shinde (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री पदावरून सध्या सुरु असलेली भाजप आणि शिवसेना पक्षातील रस्सीखेच अद्याप तरी संपलेली नाही. भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत तर शिवसेनेकडून मात्र दोन नावं या शर्यतीत दिसून येतात. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही दोन नावं सध्या शिवसेनेत प्रचंड गाजत आहेत.

अलीकडेच पार पडलेल्या विधिमंडळाच्या बैठकीत आमदार आदित्य ठाकरेंनीच विधिमंडळ पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सर्वानुमते त्यांची निवड जाहीर करण्यात आली. पण एक सामान्य रिक्षावाला ते शिवसेना नेता असा प्रवास गाठणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील प्रवास नेमका कसा आहे तो पाहूया.

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत ठाण्यातील कोपरी- पाचपाखाडी विभागातून आमदार म्हणून एकनाथ शिंदे हे बहुमताने निवडून आले.

शिवसेनेची ठाण्यात शिंदेशाही

एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचे मूळ गाव. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे ठाण्यात आले. परंतु घरची परिस्थिती काहीशी बारी नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले. ठाण्यात आल्यावर सुरुवातीच्या काळात त्यांनी एका मच्छी कंपनीत सुपरवायजर म्हणून काम केले. पण नंतर रिक्षा चालवण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

काही काळानंतर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावाखाली येत, एकनाथ शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला. ते ठाण्यातील किसननगरचे शाखाप्रमुख बनले. आनंद दिघेंना साथ देत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनात भाग घेतला, तुरुंगवास देखील भोगला.

आणि हळूहळू हा प्रवास नगरसेवक, सभागृह नेते आणि ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार असा होत गेला.  2004 सालापासून ते सलग चौथ्यांदा ठाण्यातून आमदारपदी निवडून आले आहेत. 2014 साली त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री अशा पदांची धुरा सांभाळली. तर जानेवारी 2019 मध्ये शिंदे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री बनले.

महाराष्ट्राच्या 50-50 सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम; नव्या प्रस्ताव येणार-जाणार नाही: संजय राऊत

आता मात्र शिवसेना पक्षाकडून आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचे नवं देखील मुख्यमंत्री पदासाठी घेतले जात असल्याने शिवसेना विधिमंडळाचा हा नेता रिक्षावाला ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास गाठू शकतो.