विरार मध्ये सांडपाणी प्रकल्पामध्ये साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या 4 मजूरांचा गुदमरून मृत्यू

या साफसफाईची जबाबदारी पॉलीकॅप या कंपनीला दिली होती.

Death/ Murder Representative Image Pixabay

आज गुढीपाडव्याच्या दिवशी एकीकडे राज्यात एकीकडे चैतन्याचं वातावरण असताना विरार (Virar) मध्ये एक हृद्य हेलवणारी घटना घडली आहे. विरार मध्ये खाजगी सांडपाणी प्रकल्पामध्ये (Sewage treatment plant) साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या 4 मजूरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना आज ( 9 एप्रिल) सकाळी 11.30 च्या सुमाराची आहे. चार मजुरांपैकी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अग्निशमन दलाकडून एकाचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विरार पश्चिमेला असलेल्या ग्लोबल सिटी या सांडपाणी प्रकल्पामधील ही घटना आहे. मंगळवारी चार मजूर प्रकल्पाच्या टाक्यांची साफसफाई करण्यासाठी पाण्यात उतरले होते. या टाक्या 25-30 फूट खोल होत्या. त्यामधून गुदमरून चार जणांचा जीव गेला आहे. मृत मजुरांची नावं . शुभम पारकर , अमोल घाटाळ, निखिल घाटाळ आणि सागर तेंडुलकर आहेत. नक्की वाचा: तारापूर येथील औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे 20 कुत्र्यांचा मृत्यू .

विरार मध्ये ग्लोबल सिटीमधील 124 इमारतींचा एसटीपी प्लांन्ट साफ करताना ही घटना घडली आहे. या साफसफाईची जबाबदारी पॉलीकॅप या कंपनीला दिली होती. वसई-विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अर्नाळा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.