Flood Warning System: आता मुंबईला वेळेआधीच मिळणार पुराच्या धोक्याची माहिती; सीएम उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'पूर इशारा प्रणाली'चे उद्घाटन

महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी, मुंबई (Mumbai) तर गेले अनेक वर्षे पुराचा सामना करीत आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

गेल्या काही वर्षांत हवामानातील बदलांमुळे तसेच वाढत्या तापमानामुळे भारतात अत्याधिक पावसाच्या घटना (Heavy Rains) वाढत आहेत. महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी, मुंबई (Mumbai) तर गेले अनेक वर्षे पुराचा सामना करीत आहे. 29 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईला अशाच प्रकारच्या पुराचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले होते. आता मुंबई शहरासाठी एक अत्याधुनिक पूर इशारा प्रणाली (Flood Warning System) विकसित केली गेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईसाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन, इंटिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टम (IFLOWS) चे उद्घाटन करण्यात आले, ज्याचा उल्लेख 'वरदान' म्हणून केला गेला आहे.

उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धनदेखील उपस्थित होते. ते म्हणाले की, पुराचा इशारा देणाऱ्या या यंत्रणेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होऊ शकेल. पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी एकत्रितपणे ही यंत्रणा विकसित केली आहे. उद्घाटनानंतर उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले की, ‘पूर इशारा यंत्रणा शहरासाठी एक वरदान आहे आणि त्यामुळे मुंबईला वाचविण्यात मदत होईल.’ त्यांनी पुढे निसर्ग चक्रीवादळाचा दाखला देत सांगितले, ‘काही दिवसांपूर्वी चक्रीवादळाबद्दल महाराष्ट्राला इशारा मिळाला होता, त्यामुळे राज्य सरकार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवू शकले.’ (हेही वाचा: महाराष्ट्रात मान्सूनचा लँडफॉल; पुढील 48 तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार)

जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पूर येणार आहे तसेच अगदी वादळासारख्या संकटाची देखील पूर्व सूचना मिळू शकणार आहे. यामुळे मुंबईला सावध होण्यासाठी वेळ मिळेल. या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे, एखाद्या भागात गटारी, नदी यातील रिअल टाईम होणारी पाण्याची होणारी हालचाल, त्याचे प्रवाह यांचेही आडाखे बांधता येणे शक्य होईल. यामुळे मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचविणे शक्य होणार आहे.