Five Drown In Nagpur: नागपूर येथे तलावात बुडून 5 मित्रांचा मृत्यू
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने ऋषिकेशने शंतनू, राहुल मेश्रामला सोबत घेऊन तळ्याकाठी जाण्याचा प्लान आखला.
नागपूर शहरातून (Nagpur) एक भयानक घटना समोर आली आहे. रविवारी तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या 5 जिवलग मित्रांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. मोहगाव झिल्पी तलावात रविवारी ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. ऋषिकेश पराळे (वय 21) राहुल मेश्राम (वय 23), वैभव भागेश्वर वैद्य (वय 24) शंतनू अरमरकर (वय 23) आणि नितीन नारायण कुंभारे अशी मृत तरुणांची नावे आहेत. पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. (हेही वाचा - NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार कराडकडे रवाना, अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात उलथापालत)
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने ऋषिकेशने शंतनू, राहुल मेश्रामला सोबत घेऊन तळ्याकाठी जाण्याचा प्लान आखला. ठरल्याप्रमाणे ऋषिकेश शंतनू, राहुल आणि अन्य मित्रासह मोहगाव झिल्पी तलावावर पोहचला. त्याने डॉ. प्राजक्त लेंडे आणि त्यांचा मित्र वैभव वैद्य या दोघांनाही तेथे बोलावले. दरम्यान, तलावात असलेले पाणी पाहून ऋषिकेश, शंतनू, राहुल आणि त्याच्या मित्राला पोहण्याचा मोह आवरता आला नाही.
चौघांनाही पोहणे येत नव्हते, तरीही ते एकमेकांच्या सहाय्याने तलावाच्या पाण्यात उतरले. सुरुवातीला तलावाच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. मात्र, ऋषिकेश खोल पाण्यात गेला. त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे गेले. चौघेही बुडायला लागले. त्यामुळे वैभव वैद्य हा त्यांना वाचवायला गेला. तोही बुडाला. हे सर्व तरुण प्राजक्तच्या समोर बुडाले. दरम्यान, याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. तसेच उर्वरित तिघांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.