उदयनराजे भोसले यांना पहिला धक्का; सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक लांबणीवर
अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, केरळ , मध्यप्रदेश, मेघालय , ओडिसा ,पॉण्डचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा पोटनिवडणुका पार पडत आहेत.
Lok Sabha Bypoll Election 2019: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसोबतच भारतीय निवडणूक आयोगाने देशभरातील लोकसभेच्या 64 जागांवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमाच्या माध्यमातून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना पहिला धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे जे वेळापत्रक जाहीर केले त्यात सातारा लोकसभा मतदारसंघातील रिक्त जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख नाही. याचा अर्थ सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Lok Sabha Constituency) पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या तिकिटावर विद्यमान खासदार म्हणून निवडूण आल्याला अवघे शंभर दिवस पूर्ण होत असतानाच उदयनराजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला आहे. उदयनराजे यांचा पक्षप्रवेश दणक्यात पार पडल्यावर विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा येथूनही पोटनिवडणूक (Satara Bypoll Election) घेतली जाईल, असा अनेकांचा कयास होता पण, तसे घडले नाही.
महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांमध्ये येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडत आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यास मोठी राजकीय रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. शिवसेना-भाजप लोकसभा निवडणूक युतीद्वारे लढली होती. यूतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे इथे भाजपतून शिवसेनेत आलेल्या नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. आता उदयनराजेच भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत शिवसेना आपला उमेदवार उतरवणार की ही जागा मित्रपक्ष भाजपला सोडणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षानेही जोरदार कंबर कसली आहे. एक राजकीय खेळी अशीही केली जात होती की, उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवण्याचे प्रयत्न होते. मात्र, त्यास फार यश आले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना उदयनराजे भोसले यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याचे जवळपास नक्की झाले आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: सर्वच राजकीय पक्ष, उमेदवारांना विधानसभा निवडणूक सोपी नाही; निवडणूक आयोगाकडून अचारसंहिता नियमावली अधिक कडक)
पोटनिवडणुका होऊ घातलेली राज्ये
अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, केरळ , मध्यप्रदेश, मेघालय , ओडिसा ,पॉण्डचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा पोटनिवडणुका पार पडत आहेत.