१२ नोव्हेंबरपासून बेलापूर-खारकोपर लोकल सेवा होणार सुरु
त्यानंतर उद्यापासून नवी मुंबईकरांसाठी ही रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार आहे.
नेरुळ ते उरण रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच नेरूळ ते खारकोपर लोकल सेवा प्रवाशांसाठी सोमवारपासून खुली होणार आहे. आज नवी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते रेल्वेच्या विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. खारकोपर रेल्वे स्थानकात आज पियुष गोयल पहिल्या रेल्वेला हिरवा कंदील देतील. त्यानंतर उद्यापासून नवी मुंबईकरांसाठी ही रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार आहे.
कसा असेल मार्ग ?
सुरुवातीच्या टप्प्यात नेरुळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर अशा दोन रेल्वे सेवा अप आणि डाऊन मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. दिवसभरात लोकलच्या ४० फेऱ्या असणार आहेत. या रेल्वे मार्गावर ४ उड्डाणपूल, १५ भुयारी मार्ग आणि ७८ नाले आहेत. नेरुळनंतर सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामनडोंगरी आणि खारकोपर ही स्थानके आहेत. तरघर हे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.
वेळापत्रक काय असेल ?
नेरुळ खारकोपर दरम्यान पहिली ट्रेन सकाळी ७. ४५ मिनिटांनी धावेल तर संध्याकाळी शेवटची ट्रेन ८. ४५ मिनिटांनी धावेल.
खारकोपर ते नेरुळ दरम्यान पहिली ट्रेन सकाळी ६. ५० मिनिटांनी सुटेल तर शेवटची ट्रेन रात्री ९. १५ मिनिटांची आहे.
बेलापूर ते खारकोपर दरम्यान पहिली ट्रेन सकाळी ६. २२ मिनिटांनी धावेल तर संध्याकाळी शेवटची ट्रेन ९. ३२ मिनिटांनी धावेल.
खारकोपर ते बेलापूर दरम्यान पहिली ट्रेन सकाळी ८. १५ मिनिटांनी सुटेल तर शेवटची ट्रेन रात्री १०.०० वाजताची आहे.