सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात नागपाड्यात आंदोलन करणाऱ्या 200 महिलांवर गुन्हा दाखल

मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी आंदोलनकर्त्या महिलांसंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर विविध कलमान्वये या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CAA Protest ( फोटो क्रेडिट- ANI)

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) कायद्याविरोधात नागपाड्यात (Nagpada) आंदोलन करणाऱ्या 200 महिलांवर गुन्हा दाखल (FIR Registered)  करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे (BMC Asst Commissioner Alka Sasane) यांनी आंदोलनकर्त्या महिलांसंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर विविध कलमान्वये या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतील नागपाड्यातही सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. नागपाड्यात अनेक स्थानिक मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. (हेही वाचा - दिल्लीमध्ये महिला उपनिरिक्षकेची गोळी घालून हत्या)

नागपाड्यात दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर सुरु असलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. पोलिसांनी अनेकदा नोटिसा पाठवूनही येथील महिलांनी आंदोलन मागे घेतले नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नसीम सिद्दिकी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन नागपाड्यातील महिलांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका या महिलांनी घेतली होती. सीएए आणि एनआरसी विरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.