भंडारा, महाप्रसादासाठी आता परवाना बंधनकारक; FDA च्या कडक नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल
राज्यातील भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रमांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नोंदणी बंधनकारक केली असून, विनापरवाना आयोजन केल्यास आयोजकांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता राज्यभरात आयोजित होणाऱ्या भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रमांसाठी आता अधिकृत नोंदणी किंवा परवाना बंधनकारक केला आहे. विनापरवाना असे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित आयोजकांवर थेट कायदेशीर कारवाई होणार असून, गरज पडल्यास गुन्हाही दाखल केला जाईल. अन्नातून विषबाधा होण्यासारखे प्रकार टाळण्यासाठी आणि अन्न सुरक्षा तसेच स्वच्छता मानके राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे नवा नियम
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाप्रसाद आणि भंडारा आयोजनासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात अन्नवाटप करण्यापूर्वी आयोजकांना अधिकृत नोंदणी किंवा परवाना घेणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
स्वच्छता आणि अन्न सुरक्षेवर भर
नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक अटी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अन्न तयार करताना आणि वाटप करताना मास्क, हातमोजे वापरणे तसेच स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी आरओ पाण्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाप्रसाद तयार करणाऱ्या आणि वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांनी डोक्यावर टोपी घालणे आवश्यक आहे.
अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील किंवा अन्नसुरक्षेच्या दृष्टीने योग्य असलेल्या भांड्यांचाच वापर करावा लागणार आहे. तसेच शिळे अन्न भाविकांना वाटप केल्याचे आढळल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नक्की वाचा: महाराष्ट्रात आता सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी, तेलाच्या पुनर्वापरालाही चाप; FDA चा कडक 14 कलमी आदेश .
नोंदणी प्रक्रिया सुलभ, शुल्क अवघे शंभर रुपये
आयोजकांना नोंदणी प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी एफडीएने ही प्रक्रिया सुलभ केली आहे. ऑनलाइन पद्धतीने अवघ्या शंभर रुपयांमध्ये नोंदणी करून आवश्यक परवाना मिळवता येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळखोरांविरोधात राज्यभर धडक कारवाई सुरू केली असून, अन्नातील भेसळ आणि एफडीएच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सुट्या तेलाची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता आणि ग्राहकांनाही सुट्टे तेल न खरेदी करण्याचे आवाहन केले होते. याच मालिकेत आता भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रमांवरही एफडीएने लक्ष केंद्रित केले आहे.
सण-उत्सवांच्या काळात राज्यभरात अनेक ठिकाणी भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने एफडीएने हे पाऊल उचलले आहे.