Thane: मीटरमध्ये चीप लावून पिता-पुत्राने केली 5 कोटींची वीज चोरी, असा प्रकार आला उघडकीस
गेल्या 29 महिन्यांत एकूण 34 लाख (34,09,901) युनिट्सपेक्षा जास्त वीजचोरी झाल्याचा अंदाज ₹5.93 कोटी आहे.
ठाणे जिल्ह्यात (Thane) वीजचोरी केल्याप्रकरणी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड (Murbad) भागातील आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) च्या पथकाने 5 मे रोजी फाळेगाव येथील एका दगडी क्रशिंग युनिटवर छापा टाकला होता. यानंतर हा कारनामा उघड झाला. ते म्हणाले, “मीटर रीडिंगमध्ये छेडछाड करणाऱ्या गॅझेटचा वापर करून वीजचोरी दूरस्थपणे केली जात होती. गेल्या 29 महिन्यांत एकूण 34 लाख (34,09,901) युनिट्सपेक्षा जास्त वीजचोरी झाल्याचा अंदाज ₹5.93 कोटी आहे.
चंद्रकांत भांबरे आणि त्यांचा मुलगा सचिन यांच्याविरुद्ध विद्युत कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुरबाड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली. ते कल्याण तालुक्यातील फाळेगाव येथील रहिवासी आहे. TOI च्या वृत्तानुसार, दक्षता पथकाने 5 मे रोजी क्रशर कंपनीच्या वीज मीटरची तपासणी केली. मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट लावून क्रशर ऑपरेटरने गेल्या 29 महिन्यांत 34 लाख युनिटहून अधिक वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. (हे देखील वाचा: ट्र्क-ट्रेलरचा भीषण अपघात; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी)
प्राथमिक तपासात मीटरमध्ये छेडछाड करण्यात आली असून वीज वापराच्या नोंदी संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मीटर जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रयोगशाळेत मीटर तपासले असता रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हे सर्किट नियंत्रित केल्यास क्रशरचा प्रत्यक्ष वीजवापर मीटरमध्ये कमी नोंदविला जातो, असे आढळून आले. अशाप्रकारे डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत पिता-पुत्रांनी मिळून कोट्यवधी रुपयांची वीजचोरी केली. आरोपीविरुद्ध विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.