Farmers' Tractor Rally: 'पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक करू नका' दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यानच्या हिंसाचारावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

या रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यामुळे दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे.

Sharad Pawar (Photo Credit: Twitter)

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला (Tractor Rally) हिंसक वळण लागले आहे. या रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यामुळे दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक मोदी सरकारने करु नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यानच्या हिंसाचारानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार शाब्दिक हल्ला चढवला आहे. दरम्यान, दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार आहे. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहेत. पंजाब-हरियाणा देशाचा अन्नदाता आहे. सरकारने शेतकऱ्यांना न दुखावता मार्ग काढायला हवा होता. ज्या पद्धतीने येण्या जाण्यासाठी काही परवानग्या द्यायला हव्या होत्या. पण जाचक अटी लादल्या गेल्या. त्यामुळे प्रतिकार झाला. संयम आणि 60 दिवसांचे आंदोलन पाहून ही परिस्थिती हाताळायला हवी होती. पण ते न केल्याने वातावरण चिघळले आहे. याशिवाय एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आपण पाहिला आहे. तो सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक मोदी सरकारने करू नये, असेही आवाहन शरद पवार यांनी केले आहे. हे देखील वाचा- Farm Laws: दिल्ली मधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ही काढली ट्रॅक्टर रॅली

एएनआयचे ट्विट-

दिल्लीत आज घडलेल्या हिंसाचारानंतर शहरातील सिंगू, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई आणि दिल्ली भागात दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11. 59 मिनिटापर्यंत इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती दूरसंचार विभागाने दिली आहे.