परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे नुकसान; श्रीरामपुरमधील शेतकऱ्याने सोयाबीनच्या पिकाला लावली आग

ओल्या दुष्काळामुळे खरीप हंगामातील बाजरी, कपाशी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीरामपुरमधील एका शेतकऱ्याने आपल्या घरासमोर सोयाबीनच्या पिकाला आग लावली आहे.

File photo/representational Photo

राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी हैरान झाले आहेत. ओल्या दुष्काळामुळे खरीप हंगामातील बाजरी, कपाशी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीरामपुरमधील एका शेतकऱ्याने आपल्या घरासमोर सोयाबीनच्या पिकाला आग लावली आहे. सोयाबीनच्या शेंगा पावसात भिजल्याने वाया गेल्या आहेत. सोयाबीनच्या शेंगा भिजून सुकल्याने त्या हलक्या होऊन मशिनमधून भुशाबरोबर उडून जात आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या माळवाडगावातील शेतकरी रमेश आसने यांनी घरासमोरच सोयाबीनची गंज पेटवून दिली.  (हेही वाचा  - खुशखबर! पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनामे करण्याचे आदेश)

आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे आसने त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी रागात सोयाबीनच्या पिकाला आग लावली. निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावेळी पाऊस उशिरा झाल्याने पेरणीला उशीरा सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर परिस्थिती चांगली झाली आणि पिके दिसायला लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. परंतु, कापसाचे पीक चांगले येईल आणि चांगली दिवाळी साजरी होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे.

राज्यात सर्वत्र पिकाचे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यासमोर ओला दुष्काळ, आस्मानी संकट तर कधी अवकाळी पाऊस असे सगळे प्रश्न उभे आहेत. पिकांच्या नुकसानभरपाईसाठी शेतकरी आस लावून बसला असताना राजकारणी मात्र सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची व्यथा कोण ऐकणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु, अद्याप सरकारकडून  शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही.