Mumbai: अमेरिकन नागरिकांना व्हायग्रा विकणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; पाच जणांना अटक
आरोपींनी बंगला भाड्याने घेतला होता आणि मार्च महिन्यापासून लाइफस्टाइल फिटनेस सेंटरच्या बहाण्याने येथे कॉल सेंटर चालवले होते.
Mumbai: बोरिवली पोलिसांनी ( Borivli Police) एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. आरोपींनी अमेरिकन नागरिकांना (US Citizens) त्यांच्या देशात प्रतिबंधित कामोत्तेजक औषधे 50 टक्के सवलतीत विकण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोराई येथील ज्या बंगल्यात कॉल सेंटर (Call Centre) चालवले जात होते, त्या बंगलात पूर्वी कोचिंग क्लासेस चालवले जात होते. आरोपींनी बंगला भाड्याने घेतला होता आणि मार्च महिन्यापासून लाइफस्टाइल फिटनेस सेंटरच्या बहाण्याने येथे कॉल सेंटर चालवले होते.
बोरिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर डीसीपी अजय कुमार बन्सल यांच्या देखरेखीखाली, एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. त्यानंतर दहशतवाद विरोधी सेल, सायबर सेल आणि डिटेक्शनमधील अनेक अधिकारी छाप्यासाठी पाठवण्यात आले होते. निरीक्षक विजय माडये यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून 11 हार्ड डिस्क आणि संगणक जप्त केले आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Escort Site वर बायको, बहिणीचे फोटो; ऑनलाइन मसाज सेवा शोधताना मुंबईतील व्यक्तीस धक्का)
चौकशीदरम्यान असे आढळून आले की, आरोपी अमेरिकेतील लोकांना वियाग्रा, सियालिस, लेविट्रा आणि जेली यांसारख्या सेक्स परफॉर्मन्स वाढवणाऱ्या वस्तू विकण्याच्या बहाण्याने फोन करत असतं आणि त्यांची ऑर्डर बुक करण्याचे नाटक करून पैसे घेत असे. क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतर, ग्राहकांना डिलिव्हरी दिली जात नव्हती.
कॉल सेंटरच्या मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांचा सूत्रधार अद्याप फरार आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड शादाब शेख हा फरार आहे. त्याला यापूर्वी मुंबई आणि दुसऱ्या राज्यात अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. आम्ही त्याचा शोध घेत आहोत, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, आरोपींना आयपीसीच्या कलम 276, 417, 419, 420, आणि 34 आणि आयटी कायद्याच्या कलम 65, 66 (के), 66(डी), 72(अ), आणि 75 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.