देवेंद्र फडणवीस होणार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री; शुक्रवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिवसेना सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहे.

Devendra Fadnavis (Photo Credit - Facebook)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शुक्रवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ (Oath) घेणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिवसेना सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. परंतु, फडणवीस यांनी मंगळवारी शिवसेनेला कोणतेही आश्वासन दिले नसून आपणचं मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शिवसेना सत्ता स्थापनेसंदर्भातील मागणी मागे घेईल, अशी अपेक्षा भाजपकडून होत आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

हेही वाचा - BJP च्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक, देवेंद्र फडणवीस यांना नेतेपद मिळण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टोबरला किंवा 1 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तसेच शिवसेनादेखील भाजपसोबत सत्तेत सहभागी होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेची समजूत काढण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होईल, असं मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा - नवे मुख्यमंत्री कोण ते आदित्य ठाकरे यांनी काय करावं... पाहा देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख 10 मुद्दे

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, शिवसेनेशी युती करताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता. तसं कोणतही आश्वासन दिलं नव्हतं, असं  फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. शिवसनेच्या मागण्या मेरिटनुसार मान्य केल्या जातील, असंही फडणवीस यांनी मंगळवारी सांगितलं होतं.