Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण लाभार्थ्यांना 300 रुपयांची एलपीजी सबसिडी' हा दावा दिशाभूल करणारा,DGIPR चा फॅक्ट चेक
यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत लाडकी बहीण लाभार्थ्यांना ३०० रुपयांची एलपीजी सबसिडी मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.
'Pravin Amzare MH 32' या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना ३०० रुपयांची एलपीजी सबसिडी मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता. "३ फ्री सिलेंडर वितरण सुरू", "सबसिडी वाटप" आणि "पैसे आले" अशा मथळ्यांचा वापर या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये करण्यात आला होता.
DGIPR चे स्पष्टीकरण
'Pravin Amzare MH 32' या यूट्यूब चॅनलवरील लाडकी बहीण लाभार्थींना ३०० रुपयांची #LPG सबसिडी मिळत असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (डीजीआयपीआर) या दाव्याची तपासणी केली. हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी जाहीर केले. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या फॅक्ट चेकमध्ये याबाबत पुढील स्पष्टीकरण देण्यात आले.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (पीएमयूवाय) दिली जाणारी ३०० रुपयांची सबसिडी ही केंद्र सरकारची रिफिल सबसिडी आहे.
- ही रक्कम लाडकी बहीण योजना किंवा अन्नपूर्णा योजनेचा स्वतंत्र लाभ नाही.
- लाडकी बहीण योजनेचा मासिक लाभ १,५०० रुपये इतकाच आहे.
दोन्ही योजना वेगळ्या
या स्पष्टीकरणानुसार, केंद्र सरकारची उज्ज्वला योजना आणि राज्य सरकारची लाडकी बहीण योजना या दोन स्वतंत्र योजना आहेत. उज्ज्वला योजनेचा लाभ त्या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनाच मिळतो. लाडकी बहीण योजनेत नोंदणी झाली म्हणून तो आपोआप मिळत नाही. त्यामुळे लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या खात्यात ३०० रुपये एलपीजी सबसिडी जमा होत असल्याचा दावा चुकीचा ठरतो.
नागरिकांना आवाहन
अशा व्हिडिओंमधील मथळे आणि थंबनेल पाहून पैसे जमा झाल्याचे समजू नये, असे यावरून स्पष्ट होते. योजनांबाबतची खात्रीशीर माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आणि अधिकृत समाजमाध्यम खात्यांवर तपासावी. बँक खात्यातील जमा रकमेची खात्री बँकेकडून किंवा संबंधित योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून करावी.