Facial Recognition System: पश्चिम रेल्वेच्या ऑपरेशन यात्री सुरक्षेने चोरीच्या प्रकरणांमधील 460 आरोपींना पकडले; फेशियल रिकग्निशन सिस्टीमने केली मोठी मदत
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फायदे स्पष्ट करताना, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘20 जुलै 2023 रोजी, पश्चिम रेल्वे आरपीएफच्या गुन्हे प्रतिबंध आणि शोध पथकाने (CPDS) अंधेरी येथे CCTV फुटेजचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केल्यानंतर करीम शाकीर शाह (42 वर्ष) याला यशस्वीरित्या पकडले.'
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) जानेवारी ते 20 जुलै 2023 दरम्यान चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या 460 आरोपींना पकडले आहे. रेल्वेने गुरुवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली. आरपीएफच्या यशाचे श्रेय ऑपरेशन यात्री सुरक्षेचा एक भाग म्हणून फेशियल रिकग्निशन सिस्टीम (FRS) ने सुसज्ज नवीन स्थापित केलेल्या अत्याधुनिक CCTV कॅमेऱ्यांना दिले जाते. या फेशियल रिकग्निशन सिस्टीम कॅमेऱ्यांमुळे चोरांना पकडण्यास मदत झाली. आता पुढील कारवाईसाठी सर्व आरोपींना शासकीय लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एफआरएस तंत्रज्ञानामध्ये ज्ञात गुन्हेगारांचे तपशील आणि त्यांच्या फोटोंचा समावेश आहे, ज्याने 60% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यापैकी बहुतेक प्रकरणे पश्चिम रेल्वेच्या गजबजलेल्या मुंबई उपनगरी विभागात नोंदवली गेली. आरपीएफच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन यात्री सुरक्षा, प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फायदे स्पष्ट करताना, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘20 जुलै 2023 रोजी, पश्चिम रेल्वे आरपीएफच्या गुन्हे प्रतिबंध आणि शोध पथकाने (CPDS) अंधेरी येथे CCTV फुटेजचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केल्यानंतर करीम शाकीर शाह (42 वर्ष) याला यशस्वीरित्या पकडले. त्याच्यावर 8,500 रुपये किमतीचा मोबाईल चोरीचा आरोप होता. पुढील चौकशीत अशाच इतर तीन प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग उघड झाला.’ (हेही वाचा: सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणं ट्विटर यूजर्संना भोवणार; देवेंद्र फडणवीसांनी दिले कारवाईचे आदेश(
त्याच दिवशी, CCTV च्या मदतीने सीपीडीएस टीमने 20,000 रुपये किमतीचा मोबाइल फोन चोरण्यासाठी जबाबदार असलेल्या शरुफद्दीन शुमशू सय्यद (25 वर्ष) या आणखी एका गुन्हेगाराला पकडले. सय्यदने आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदवलेले इतर पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. अशाप्रकारे फेशियल रेकग्निशन सिस्टीमचा वापर प्रवाशांशी संबंधित गुन्ह्यांविरूद्धच्या लढ्यात गेम चेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे.